अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात चांदी

जगातील अनेक देशांत बंदी असलेल्या कीटकनाशकांचा वापर भारतात होतो. त्यासोबतच अशी कीडनाशके शिफारसीत नसतानासुद्धा कॉकटेल (मिश्र) करून वापरली जातात. विषबाधेसाठी अशाप्रकाराचा वापर कारण ठरत असताना अशा प्रकरणात बीटी तंत्रज्ञानावर दोष देणे संयुक्तिक ठरणार नाही. - डॉ. केशव क्रांती, समन्वयक, आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती, वॉशिंग्टन
कीटकनाशक फवारणी
कीटकनाशक फवारणी

नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे. त्यावर जगातील सुमारे ६० देशात बंदी आहे. विशेष म्हणजे शेजारच्या बांगलादेशनेदेखील यावर बंदी लादली आहे. भारतात भाजीपाल्यावर वापरण्यास मोनोक्रोटोफॉसला बंदी असली तरी उर्वरित क्षेत्रात वापर खुला आहे. तसेच ट्रायझोफॉस या कीडनाशकावर ४३ देशांत बंदी आहे. मिथोमेल हेदेखील बंदीच्या प्रतीक्षेत आहेत. अशी अनेक कीटकनाशके भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. एकप्रकारे जगात बंदी असलेल्या कीटकनाशकांची भारतात विक्री करून कंपन्या खोऱ्याने पैसे ओढत आहेत. सरकार मात्र कंपन्यांच्या दबावामुळे देशात लोकहिताचे निर्णय घेत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे २००९ मध्ये भारताला अमेरिकेने अतीजहाल कीडनाशकासंदर्भात कळविले होते; त्या सूचनेकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने वर्ग १- ब श्रेणीमध्ये या घातक कीडनाशकांचा समावेश केला आहे. परंतु, भारतात कंपन्यांच्या दबावापुढे असलेल्या सरकारकडून लोकहिताचे निर्णय घेतले जात नसल्याची चर्चा आहे. भारतात एका मोठ्या कीटकनाशक पुरवठादाराच्या दबावाखाली असलेल्या सरकारकडून या संदर्भाने निर्णय घेतले जात नसल्याचे सूत्रांनी म्हणणे आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील किडीचे नियंत्रण करताना तब्बल २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर ५०० पेक्षा अधिक बाधीत झाले. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर प्रशासनासह सारेच खडबडून जागे झाले. बीटी वाणांवर बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव चर्चेत आला. त्याचे नियंत्रण करतानाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे दावे सुरू झाले.

परंतु, हा सारा प्रकार दिशाभूल करण्यासारखा असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. बीटी कपाशीवर कीड आली त्यामागे अनेक कारणे असली तरी शेतकऱ्यांचा मृत्यू हा फवारणी दरम्यान झाला हे सत्यदेखील नाकारला येणार नाही. बीटीवरील किडीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला का, तर या प्रश्‍नाचे उत्तर कोणीही नाही असेच देईल. मात्र कीडनाशकाच्या फवारणीचे हे सारे बळी ठरले असे म्हटले तर सारेच होकार देतील.

दिशाभूल करण्याचे प्रयत्न यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर विषबाधेने २२ शेतकरी, मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणात कीटकनाशकांचा दोष असताना सरसकट बीटी तंत्रज्ञानाला दोषी ठरवित नियोजनबद्धरीत्या दिशाभूल केली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे कापूस विषयाचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. केशव क्रांती यांनीदेखील त्यास दुजोरा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com