विदर्भ
विदर्भ

वऱ्हाडात दुष्काळाची तीव्रता वाढतीच

अकोला ः या भागातील शेतकरी मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थितीशी झगडत आहे. कधी कमी पावसाचा फटका बसतो तर कधी दोन पावसातील एका मागोमाग येणाऱ्या खंडांचा ताण पिकांना सहन होत नाही. याही खरिपात अशीच भयानक परिस्थिती उद्‌भवली आहे. पावसाच्या चार महिन्यांत पाऊस झाला खरा मात्र खंड मोठे पडले. थोडासा ओलावा, अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मूग, उडीद, सोयाबीन हे पीक एकदाचे हातात आले. आता राहलेल्या कापूस, तुरीला मात्र ही कोरड झेपावत नाही. विविध महसूल मंडळांमध्ये दिवाळीपूर्वीच उलंगवाडी सारखी परिस्थिती उद्‌भवली आहे.  दुष्काळी परिस्थितीने वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात सरासरी साडेसात लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे चार लाख ३३ हजार हेक्‍टर क्षेत्राला बाधा पोचल्याचा अहवाल शासकीय यंत्रणांनीच काढला आहे. तर अकोल्यात सुमारे २० हजार आणि वाशीममध्ये ४३०० हेक्‍टर क्षेत्र बाधीत झालेले आहे.   या विभागात बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्यात पाऊस सुुरू झाल्यानंतर पेरणी सुरू झाली. यावर्षी संपूर्ण क्षेत्र लागवडीखाली आले. अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे पिकांची वाढली. पण मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फुलोरा, शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला. यामुळे उत्पादनाला मार बसला. मूग, उडीद एकरी ५० किलोपासून दोन क्विंटलपर्यंत तर सोयाबीनचे उत्पादन एकरी २ पोत्यापासून सहा पोत्यांपर्यंत राहले. खरिपात सोयाबीन सुमारे चार लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केल्या गेली होती. गेल्यावर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्याने तसेच कापसाच्या दरात तेजी राहल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांचे क्षेत्र कमी करीत कपाशी लागवडीकडे वाढता कल दिला. जिल्ह्यात सुमारे एक लाख ८० हजार हेक्‍टरपेक्षा  अधिक क्षेत्रावर लागवड झाली होती. आता कपाशीचे उभे पीक सुकत आहे.

पीककर्जाचा आधार नाही प्रशासनाने खरिपासाठी पीककर्ज वाटपाचे मोठे आकडे निश्‍चित केले तरी वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये लक्ष्याच्या ३० टक्‍क्‍यांपर्यंतही बॅंका पोचू शकलेल्या नव्हत्या. ७० पीककर्ज वाटपच होऊ शकलेले नाही. रब्बी संकटात यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिकांपाठोपाठ रब्बी पिकांची लागवड अडचणीत सापडली आहे. अकोला जिल्ह्यातही परतीचा पाऊस न झाल्याने तसेच आधीची आर्द्रता संपुष्टात आल्याने रब्बी लागवडीवर परिणाम झाला. प्रशासनाने रब्बी नियोजन केले तरी किती लागवड होईल हे निश्‍चित सांगता येत नसल्याचे अधिकारी सांगतात. नदी नाले कोरडे, पाण्यासाठी भटकंती पुरेसा पाऊस न झाल्याने या वर्षात बुलडाण्यात पिण्याच्या पाण्यासाठी हिवाळ्यातच भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्याच्या जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या पूर्णा, खडकपूर्णा, पैनगंगा या प्रमुख नद्यांचे पात्र कोरडेठाण पडलेले आहे. प्रकल्पांमध्ये सरासरी २० टक्‍क्‍यांच्या आत पाणीसाठा आहे. हे सर्वपाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांपासून कृषिराज्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी दिले आहेत. आजवर नदी किनाऱ्यावर असलेल्या शेतांना कधी पाणी समस्या भासली नाही. यंदा मात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सिंचनासाठी पाण्याचा थेंबही मिळेनासा झाला. नदीपात्र कोरडे पडले असून शेतकरी पात्रात १५ ते २० फुटांपर्यंत खोल खड्डे करीत पाणी शोधत आहेत. मात्र कुठेही पाणी मिळत नाही. अकोला जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरलेले आहेत. मात्र या पाण्याचा कोरडवाहू पिकांना काही फायदा झालेला नाही. जमिनीतील ओल दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने रब्बी किती साधेल याची काहीही खात्री दिसत नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com