आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज प्रारंभ

आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज प्रारंभ
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज प्रारंभ

औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आज(बुधवार)पासून आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील प्रतिनिधींसह शेतकऱ्यांच्या सहभागातून होणारी ही परिषद तीन दिवस चालणार आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हॉटेल अजेंठा ॲम्बेसिडरमध्ये बुधवारी (ता. १६) या परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या परिषदेत जवळपास साडेसातशे प्रतिनिधी सहभागी होणार असून जगभरातील जवळपास पन्नास देशांतील शंभरावर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये मंगळवारी (ता. १५) वाल्मी येथे आयोजित राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बारा राज्यातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदविला. यापैकी दीडशे शेतकरी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सूक्ष्म सिंचनाच्या वापरातून विविध देशातील शेती सिंचनामध्ये, पिकाच्या उत्पादनामध्ये झालेले बदल आदीविषयी सादरीकरण केले जाणार आहे. शेतकऱ्यांचे अनुभवातून आलेले सादरीकरणही होणार आहे. परिषदेच्या ठिकाणी सूक्ष्म सिंचन वा पाण्याच्या विषयावर काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे स्टॉल लावणयात आले आहे. कार्यशाळेच्या निमित्ताने कडवंचीला भेट दिल्यानंतर नगर जिल्ह्यातील हिवरेबाजारला देशभरातील विविध राज्यातील शेतकऱ्यांच्या भेटीचेही नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी (ता. १५) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या प्रसंगी केंद्र सरकारच्या विविध विभागाचे प्रतिनिधित्व करणारे नितीश्वर कुमार, अमरेंद्रकुमार सिंह, वरिष्ठ कार्यकारी निर्देशक रजनीकांत, सीडब्ल्यूसीचे संचालक आणि आयएनसीएसडब्ल्यूचे सचिव अनुज कनवाल, आर. के. अग्रवाल, डॉ. अमन शर्मा, एस. के. हलदर आदींची उपस्थिती होती. नॅशनल जल मिशनच्या माध्यमातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होणाऱ्या देशातील सात ते आठ क्‍लस्टरमध्ये स्वयंसेवी संस्था, शासन व शेतकऱ्यांच्या समन्वयातून काम होत असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com