सौरऊर्जेच्या माध्यमातून १६ एकरांचे 'सिंचन'

हिवरे, जि. पुणे ः सोलरच्या माध्यमातून सिंचन योजना राबविलेल्या शेतातील बहरलेले कांद्याचे पीक दाखविताना शहाजीभाऊ जाधव.
हिवरे, जि. पुणे ः सोलरच्या माध्यमातून सिंचन योजना राबविलेल्या शेतातील बहरलेले कांद्याचे पीक दाखविताना शहाजीभाऊ जाधव.

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------ वाढते भारनियमन, वारंवार खंडित होणारी वीज, एखाद्या शेतकऱ्याचे बिल थकले तरी तोडण्यात येणारी रोहित्राची वीज, या प्रकाराला कंटाळलेल्या हिवरे (ता. शिरूर) येथील शहाजीभाऊ प्रभू जाधव यांनी यावर उपाय शोधला आहे. त्यांनी सौर पॅनेल उभारले असून, त्या माध्यमातून मिळणाऱ्या ऊर्जेतून तब्बल १६ एकर क्षेत्राचे सिंचन केले जाते.

नियमित आणि शाश्वत जलसिंचन हा आधुनिक शेतीचा एक भाग. मात्र, महावितरणचा रामभरोसे कारभार सहन करण्यापेक्षा त्याला ज्येष्ठ शेतकरी शहाजीभाऊ जाधव यांनी सौरऊर्जेचा पर्याय शोधला. सौरऊर्जेवर त्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल सोळा एकर क्षेत्राच्या सिंचनाची व्यवस्था केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत असून, अनेक जण हा प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतात येत आहेत.

ध्यास अन्‌ वाटचाल हिवरे हे खरे तर चासकमान प्रकल्पाच्या डाव्या कालव्यामुळे आठमाही सिंचनाखाली आलेले गाव. आठमाही गावात पूर्ण पाणी फिरत असल्याने गावातील अनेक विहिरी बारमाही तुडुंब भरलेल्या असतात. जाधव यांची हिवरे येथे ४८ एकर शेती असून दोन विहिरी आहेत. याच पाण्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी, तसेच विजेबाबत स्वयंपूर्ण होण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली. पत्नी हिराबाई, तसेच संभाजी, रेवणनाथ व संतोष हे मुलगे, तीन सुना व नातवंडे असे त्यांचे एकत्र कुटुंब आहे. तीनही मुलांच्या नावे प्रत्येकी १६ एकर शेती करून दिली आहे. पण, शेतीतील पीक नियोजन मात्र स्वतःकडे ठेवले. यातीलच १६ एकर क्षेत्रासाठी त्यांनी सोलर यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

सौर पॅनेल उभारण्याचा पर्याय शहाजीभाऊ गेल्या काही वर्षांपासून वीज समस्येने त्रस्त होते. अव्वाच्या सव्वा वीजबिल, मिळत असलेली वीज खंडितपणे मिळणे, कमी-जास्त दाबाने मिळणे, रोहित्र जळल्यास लवकर वीज न मिळणे, अशा समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही वर्षांपासून चासकमान कालव्याचे पाणी सुरळीतपणे मिळत असल्याने विहिरींनाही बऱ्यापैकी पाणी टिकून राहते. मात्र, पाणी असूनही विजेअभावी ते पिकांना देता येत नव्हते. यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी चौकशी केली. त्यांना अनेकांनी सोलर एनर्जीचा पर्याय सुचविला. सौर यंत्रणा कुठे मिळेल, याचा शोध घेतानाच शहाजीभाऊ यांना जातेगाव बुद्रुक येथे साहेबराव सातपुते यांचा सौर प्रकल्प पाहायला मिळाला. सातपुते आपल्या शेतात व घरात सोलरची वीज अखंडीत वापरत असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे जाधव यांनी सातपुते यांची यासाठी मदत घेतली. हे युनिट सातपुते यांच्याच सहकार्याने त्यांनी कार्यान्वित केले.

कन्व्हर्टरमुळे पंपाला धोका नाही सौर संयंत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅनेलला २५ वर्षांची वॉरंटी येते. यातील काही पॅनेल खराब निघाले तरी संबंधित कंपनी बदलून देते. या संयंत्राला बॅटरी नसल्याने देखभाल दुरुस्तीची गरज भासत नाही. पॅनेलच वीज "एसी टू डिसी'' कन्व्हर्ट करून पंपाला पुरवठा करतो. यातील कन्व्हर्टर वीज दाब नियंत्रित करणे, वीज सलगपणे पुरविणे आदी कामे करतो, त्यामुळे पंप जळत नाही, असे सातपुते यांनी सांगितले.

पैशासाठी घराचे काम थांबविले साधारण पाच अश्वशक्तीची एक मोटर बसविण्यासाठी ४ किलोवॉटचे सोलर संयंत्र कार्यान्वित करण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची गरज असल्याचे लक्षात आले. त्या वेळी त्यांनी घराचे बांधकाम थांबवून पैशांची तजवीज केली आणि १६ एकर शेतात सौरयंत्रणा कार्यान्वित केली. दरम्यान, या सव्वादोन लाखांत एकच मोटर बसविली गेली आणि तिचा पुरेपूर लाभ झाल्याने पुढील तीन महिन्यांत आणखी एक संयंत्र बसविण्याची तयारी सुरू केल्याचे जाधव यांनी सांगितले.

ऊस, कांदे, बटाट्याचे पीक या सोळा एकरांत शहाजीभाऊंनी एकूण सहा एकर ऊस, चार एकर बटाटे, चार एकर कांदे व उर्वरित शेतात जनावरांसाठी घास लागवड केली आहे. हे संपूर्ण क्षेत्र तुषार सिंचनाद्वारे सिंचनाखाली आणलेले आहे. ऊस जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा साखर कारखान्याला, तर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील फ्रुटोलिया कंपनीसाठी वेफर्स बटाट्याची लागवड केली आहे, तसा पुरवठाही त्यांनी सुरू केला आहे. दरम्यान, बटाट्यांना आणि इतर पिकांना खरे तर जून-जुलैच्या दरम्यान पाऊस हवा असतो. पावसाच्या पाण्याने पिकांना चांगला जोम येतो, तर किडीचा प्रादुर्भावही अत्यंत कमी होतो. म्हणूनच तुषार सिंचनाचा अनुभव चांगला असल्याने आपण सोलरवर तुषार सिंचन कार्यान्वित केल्याचेही जाधव सांगतात.

रोहित्र जळाले तरी सिंचन सुरूच शहाजी जाधव ज्या वस्तीवर राहतात, त्या जाधव वस्तीचे रोहित्र महिनाभरापूर्वी जळाले आहे. ते दुरुस्त करणे किंवा नवीन बसविण्यासाठी महावितरणने थकीत बिलाचा निकष लावला आहे. पर्यायाने पूर्ण रोहित्र थकबाकीविरहित होणे आणि वीजपुरवठा सुरळीत होणे या वस्तीसाठी अडचणीचे ठरलेले आहे. या रोहित्रावरील सर्व शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे मुश्‍कील झालेले असताना सौरऊर्जेमुळे शहाजीभाऊंचे एकट्याचे सिंचन सुरू आहे.

'अमृतशेठ-पोपटशेठचे संस्कार' तू फक्त व्यसन करू नकोस, तुला हवं तेवढं पाठबळ देऊ म्हणत तळेगाव ढमढेरे येथील दिवंगत अमृतशेठ पोकर्णा व पोपटशेठ शहा यांनी आपल्याला शेतीसाठी हवी ती मदत केली. त्यांच्या संस्कारांमुळे मी कधीच व्यसन केले नाही, त्याचा फायदा झाला. मोलमजुरी करणाऱ्या माझ्याकडे ४८ एकर शेती असून सर्व कुटुंब सुखी आहे, असे सांगताना शहाजीभाऊंचे डोळे पाणावले. गणेगाव-खालसाचे आपले मामा बबन बांगर हेसुद्धा देवासारखे आपल्या पाठीशी राहिल्याचे शहाजीभाऊ आवर्जून सांगतात आणि या तिघांच्या संस्कारांमुळे मी सोलर शेतीसारखा आधुनिक विचार करायला लागलो, असे त्यांनी सांगितले.

'सोलर कुटुंब बनायचंय' महावितरणचा विचित्र कारभार, रोहित्रानुसार वीजपुरवठा असल्याने इतरांच्या प्रामाणिकपणावर आपल्याला वीजपुरवठा, हे तत्त्वच त्रासदायक असल्याने आपण लवकरच घर व शेतीत संपूर्ण सोलर वीजपुरवठा सुरू करणार आहोत. अर्थात संपूर्ण कुटुंब "सोलर कुटुंब'' व्हावं म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचेही ते सांगतात.

संपर्क ः ८८८८८५४०६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com