मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची उपाययोजना

मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची उपाययोजना
मराठवाड्यातील दुष्काळावर ‘इस्राईल’ची उपाययोजना

मुंबई ः अपुऱ्या आणि अनियमित पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवते. यावर उपाययोजना करण्यासाठी इस्राईलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या शासकीय कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी (ता. १७) मंजुरी देण्यात आली. सतत उद्‌भवणाऱ्या पाणीटंचाईमुळे २०१६ च्या उन्हाळ्यामध्ये मराठवाड्याला ४००० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. याशिवाय तात्पुरत्या पाणीपुरवठा उपाययोजना हाती घ्यावा लागल्या होत्या. तसेच लातूर शहराला ३०० किलोमीटरवर असलेल्या मिरज येथून रेल्वेद्वारे पाणी पुरवण्यात आले होते. या दुष्काळी परिस्थितीवर खात्रीशीर व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ग्रामीण तसेच शहरी भागाला पाणीपुरवठा करण्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा आखण्यात येत आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी एकूण १७.९२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व शहरे, गावे व वाड्यांना उपलब्ध असलेल्या पाटबंधारे जलसाठ्यांतून ग्रीड पद्धतीने किंवा इतर मार्गांनी पाणीपुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने मराठवाड्याला ग्रीडद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ६ डिसेंबर २०१६ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. या कंपनीद्वारे उपाययोजना आखण्यासाठी सरासरी पर्जन्यमान, धरणाची साठवण क्षमता, जलसंधारण, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण, नदी खोऱ्यांमध्ये उपलब्ध असणारे पाणी, समुद्राचे पाणी गोडे करणे इत्यादी सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी इस्राईल सरकारसोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात पुढील प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्यानुसार इस्राईलचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सक्षम होणार अत्यंत कमी पर्जन्यमान असूनसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत सक्षम व्यवस्था उभारण्यात यश आलेल्या मध्य-पूर्वेतील इस्राईलचा अनुभव महाराष्ट्रासाठी उपयोगाचा ठरू शकतो. त्यांच्या याबाबतच्या ज्ञानाचा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. मराठवाड्याची पाणीपुरवठ्याची सक्षम व्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्यासाठी इस्राईल सरकानेही उत्सुकता दाखवली असून इस्राईल शासनाच्या नॅशनल वॉटर कंपनीची उपकंपनी असलेल्या मेकोरोट डेव्हलपमेंट ॲण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. ही कंपनी इस्राईल सरकारचा स्वत:चा उपक्रम असून इस्राईलमधील ८५ टक्के घरगुती पाण्याची व ७० टक्के पाण्याची मागणी या कंपनीद्वारे पूर्ण केली जाते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com