कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात गूळ सौदे बंद

कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात गूळ सौदे बंद
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात गूळ सौदे बंद

कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते व्यापारी वादात गूळ सौदे बंद पडल्याने संतप्त गूळ उत्पादकांनी बाजार समितीची सर्व प्रवेशद्वारे अडवून संताप व्यक्त केला. बाजार समितीच्या मुख्य इमारतीला टाळे लावून इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे बाजार समितीचे आवार गुरुवारी (ता. १३) दुपारपर्यंत विविध घटकांच्या संघर्षाने धुमसत राहिले. उत्पादकांची पळापळी, व्यापारी हमाल यांच्यातील जोरदार शाब्दीक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व घटकांची समजूत घातल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास बंद पडलेले गुळाचे सौदे पुन्हा सुरू झाले.  तोलाईदारांनी शेतकऱ्यांकडून तोलाईची रक्कम शेतकऱ्याकडून घेऊ नये, असे आदेश पणनविभागाचे आहेत. त्याला विरोध करण्यासाठी तोलाईदार व माथाडी कामगारांनी बुधवारी (ता. १२) काम बंद आंदोलन केले होते. गुरुवारी (ता. १३) सौद्याची तयारी सुरू असतानाच या प्रश्‍नावरून वादास सुरवात झाली. माथाडी कामगारांनी कामाच्या वेळाही वाढविण्याची मागणी केली. यामुळे गोंधळ वाढला. सौदे सुरू होत नसल्याने गूळ उत्पादक अस्वस्थ झाले. गुळाची निर्गत करण्याऐवजी हे घटकच भांडत बसल्याने जिल्ह्यातून आलेल्या गूळ उत्पादकांचा संताप अनावर झाला.  उत्पादकांच्या विरोधात इतर घटक एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने गूळ उत्पादकांनी आरडाओरड करीत बाजार समितीच्या पूर्व पश्‍चीमेकडील प्रवेशद्वारे बंद केली. यामुळे शेकडो वाहने दोन्ही बाजूंनी थांबून राहिली. जाणिवपूर्वक सौदे बंद पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला व गोंधळास सुरवात झाली. काबाडकष्ट करून शेतकरी गूळ तयार करतात. पण बाजार समितीत सौदे वेळेत होत नसल्याने शेतकऱ्याला नुकसान सोसावे लागते. शेतकऱ्यांची अडवणूक करणे हा कुटील डाव असून शेतकरी आपले नुकसान कदापि सहन करणार नाहीत, असा इशारा शेतकऱ्यांनी आरडाओरडा करीत दिला. याच दरम्यान तोलाईदारांनी स्वतंत्र बैठक घेतली. या वेळी बाजार समितीचे सभापती बाबासाहेब लाड, सचिव मोहन सालपे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी शेतकरी सर्व तुमच्या मागणीच्या बाजूने असतील; पण गुळाचे सौदे बंद पाडून शेतकऱ्याचे नुकसान करू नका सौदे तात्काळ सुरू करा असे आवाहन केले. व्यापारी व अडते हेही तिथेच थांबून होते. अखेर खडाजंगी चर्चेनंतर तोलाईदारांनी काम करण्यास होकार दर्शविला. त्यानंतर अडते व व्यापाऱ्यांनी सौदे सुरू केले. लहान गुळाचे सौदे पहिल्या टप्प्यात सुरू झाले. पण एका अडत्याच्या दुकानातील माल आम्ही उचलणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतल्याने पुन्हा सौदे बंद पडले. सौद्यातून सर्वच जण बाहेर पडून शाहूपुरी मर्चट असोसिएशनच्या कार्यालयाकडे गेले. त्यामुळे शेतकरी पुन्हा संतप्त झाले. गोंधळ सुरू झाल्याचे समजताच सचिव सालपे, सभापती लाड पुन्हा सौद्यास्थळी आले. या वेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तोलाईकामगार ऐकत नसतील तर बाजार समितीचा काय उपयोग? तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान करण्यास बसला आहात का? आम्ही उत्पादन घेतो म्हणून व्यापारी अडते, खरेदीदार माथाडी यांचा व्यवसाय होतो आणि आमचीच अडवणूक हेच घटक करत असतील तर हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे सांगत अगोदर सौदे सुरू करा अशी मागणी लावून धरली. याच वेळी शेतकऱ्याच्या एका गटाने बाजार समितीला टाळे ठोकून बाजार समितीच्या दारात ठिय्या आंदोलन केले. सालपे यांनी अडते व्यापारी यांची समजूत घालून सौद्यास्थळी आणले अखेर एकच्या सुमारास सौद्यास सुरवात झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com