कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांत

पावसाळी हवामानाचा फटका गुळाच्या आवकेस बसण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. २०) गुळाच्या आवकेत दहा टक्के घट झाली. पावसाच्या अगोदर तोडलेला ऊस गाळप करून गूळ उत्पादकांनी गूळ बाजार समितीत आणला आहे. पावसामुळे सध्या तोडणी, गुऱ्हाळघरे ठप्प आहेत. यामुळे आता पुढील दोन दिवसांत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात घटेल अशी शक्‍यता आहे. - मोहन सालपे, सचिव, कोल्हापूर बाजार समिती.
कोल्हापुरातील गुऱ्हाळघरे शांतच
कोल्हापुरातील गुऱ्हाळघरे शांतच

कोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ झाल्याने समाधान असतानाच अनाहूनपणे आलेल्या अवकाळी पावसाने गूळ उत्पादकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने अनेक गुऱ्हाळघरे शांत झाली आहेत. हंगाम भरात असतानाच गुऱ्हाळे बंद ठेवण्याची वेळ गुऱ्हाळमालकांवर आली आहे.

 गुऱ्हाळघरासाठीची ऊसतोडणी गुऱ्हाळ घरमालकांनी थांबविली आहे. सतत ढगाळ हवामान व पावसाच्या सरी गूळ पट्ट्यात होत असल्याने जळण भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे. जेवढे एकत्रित केलेले जळण आहे, ते झाकण्याचा प्रयत्न असला तरी शेतात पसरलेले जळण भिजत असल्याने आता गुऱ्हाळघरे कशी सुरू करायची या चिंतेत गुऱ्हाळघरमालक आहेत.  ऊस रस काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या उसाची चिपाडे वाळवून त्याचा वापर चुलवाणात इंधन म्हणून केला जातो. उसाची चिपाडे वाळविण्यासाठी ती गुऱ्हाळाच्या ठिकाणच्या जागेत पसरवून ठेवली जातात. ती जशी वाळतील तशी ती चुलवाणात वापरली जातात.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला. हलका पाऊस असेल व तातडीने ऊन पडले तर फारसा फरक पडत नाही. परंतु रविवारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शिवारात अक्षरश: पाणी साचले. यामुळे नाईलाजाने गुऱ्हाळघरांना गुळाचे आधण काढणे थांबवावे लागले आहे. मंगळवारी (ता. २०) दुपारपर्यंत गूळ पट्ट्यात पावसाची शक्‍यता निर्माण झाली होती. थंड वारे, तुरळक पाऊस व सातत्याने ढगाळ हवामान यामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. यामुळे गुऱ्हाळमालक हबकले आहेत.

अगोदरच उसाचा उतारा कमी आहे. त्यातच मजूर टंचाई आहे. यामध्ये गुऱ्हाळघरे बंद असल्याने गूळ पट्ट्यात मंगळवारी अस्वस्थता होती. अनेक गुऱ्हाळघरांत शुकशुकाट होता. तर जळण व अन्य साहित्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न गुऱ्हाळ घरमालकांनी केला होता. दोन दिवसांपासून आधणे बंद असल्याने गुळाचे उत्पादनही रोडावल्याचे गूळ उत्पादकांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com