सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार एफआरपीप्रमाणे दर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा जपण्याचा प्रयत्न सरुड (ता. शाहूवाडी) येथील गुऱ्हाळघर मालक भीमराव निकम यांनी केला आहे. थेट गुऱ्हाळघरावरच वजन काटा बसवून कारखान्याच्या एफआरपी इतका दर ऊस उत्पादकांना देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला. यंदा त्याचा लाभ परिसरातील ऊस उत्पादकांना होणार आहे. गुळासाठी ऊस काट्यावरच वजन करून घेऊन शेतकऱ्यांना एफआरपी इतका दर देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. शेतकऱ्यांकडून ऊस मिळविण्यासाठीच हा बदल केला आहे.

श्री. निकम यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत गुऱ्हाळमालकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मजूर समस्या, ऊस मिळण्याच्या समस्येमुळे जिल्ह्यातील अनेक गुऱ्हाळे बंद पडत आहेत. या परिस्थितीत ऊस मिळविण्यासाठी काही तरी बदल करणे अपेक्षित होते. गूळ तयार करण्याचा खर्च वाढला आहे. शेतकरी गूळ तयार करून घेण्यासाठी गुऱ्हाळघरावर आले की वाढलेला खर्च सांगितल्यास उत्पादकांची अडचण होते. यामुळेच आम्ही गूळ उत्पादकांनाही कारखान्याप्रमाणे दर देण्याचे ठरविले. यानुसार आम्ही गेल्या वेळी कारखान्याप्रमाणेच उस उत्पादकाला दर देण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी शेवटचा एक महिना आम्ही हा प्रयोग केला.

गेल्या वर्षी कारखान्यांनी पहिल्या टप्प्यात जाणाऱ्या उसास ३००० रुपये दिले. त्यानंतर साखरेचे दर कमी झाल्याने २५०० रुपये दिले. पण आम्ही शेवटपर्यंत ३००० रुपये दिल्याने उत्पादकांचे नुकसान झाले नाही. आम्हाला गुळाचे दर व इतर बाबी पाहाता थोडा तोटा सहन करावा लागला पण उसाचा पुरवठा चांगला झाला. यंदाही मी हाच फॉर्म्युला वापरत आहे. ज्याप्रमाणे कारखान्याच्या काट्यावर ऊस गेला की शेतकऱ्यांचा त्याच्याशी काही संबंध राहात नाही तशीच पद्धत मी वापरत आहे.

शेतकऱ्यांच्या उसाचे वजन झाल्यानंतर एक महिन्यात त्यांना एफआरपी इतका दर देण्याची व्यवस्था मी करणार आहे. जर कारखान्यांनी नंतर दर वाढवून दिले तर त्याप्रमाणे वाढीव रक्कमही उत्पादकांना देण्यात येईल. तयार होणाऱ्या गुळाची स्वत:च विक्री करणार आहे. शेजारील तीन कारखान्यांची एफआरपीपाहून त्यानुसार हा दर निश्‍चित करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com