नऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजे

ऊर्ध्व भागातील आवक आवक मोठ्या प्रमाणात सुरू राहिल्यास व प्रचलन आराखड्यानुसार आजघडीला 98 टक्‍के साठा असण्याचे निर्धारण याचे संतूलन राखेपर्यंत हा विसर्ग सुरू राहण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.
नऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजे
नऊ वर्षांनंतर उघडले जायकवाडीचे दरवाजे

जायकवाडी, जि. औरंगाबाद ः जायकवाडी प्रकल्पात अचानक ऊर्ध्व भागातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रकल्पाची पाणीपातळी 97 टक्‍क्‍यांच्या पुढे गेली. यामुळे गुरुवारी (ता. 21) मध्यमात्री आधी दिलेल्या सूचनेनुसार पहाटेची वाट न पाहता प्रकल्पातून गोदावरी पात्रात प्रारंभी 10 हजार क्‍युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला.

हा विसर्ग शुक्रवारी (ता.22) सकाळी 13 हजार करण्यात आला होता. तब्बल नऊ वर्षांनंतर जायकवाडीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याआधी प्रशासनाकडून शुक्रवारी (ता.22) सकाळी 7 वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाचे अठरा वक्राकार दरवाजे अर्धा फूट वरती उचलण्यात आले.

या वेळी कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड, तहसीलदार महेश सावंत, सहायक अभियंता अशोक चव्हाण, उपकार्यकारी अभियंता नंदकिशोर भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड आदींसह कर्मचारी उपस्थित होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत 34 हजार क्‍युसेकने आवक सुरू होती तोवर प्रकल्प व तालुका प्रशासनाने निर्णय घेतला नव्हता. 98 टक्‍क्‍यांपर्यंत प्रकल्प गेल्यानंतरच विसर्ग सुरू होईल अशी तयारी प्रशासनाकडून सुरू होती.

मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्याने रात्रीतून आणखी पाणी दाखल होईल ही शक्‍यता गृहीत धरून जायकवाडीतून पाणी विसर्गाचा निर्णय रात्रीच घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गावोगावी दवंडी देऊन नदीपात्रात कोणीही जाऊ नये, असा संदेश पाठवून गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाकडून आधीच पाणी सोडून खबरदारी घेतली जात आहे.

तीन हजार क्‍युसेकने विसर्ग वाढला गुरुवारी रात्री 10 हजार क्‍युसेकने सुरू केलेला विसर्ग शुक्रवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास 13 हजार क्‍युसेक करण्यात आला होता. तर प्रकल्पात 27 हजार क्‍युसेकच्या क्षमतेने ऊर्ध्व भागातून पाण्याची आवक सुरू होती व पाणीसाठा 98.07 टक्‍के होता अशी माहिती जायकवाडीवरील नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

पाणी सोडल्याचा पूर्वइतिहास जायकवाडीतून 12 वर्षांपूर्वी 27 जुलै 2005 रोजी 1 लाख 16 हजार क्‍युसेक विसर्ग करण्यात आला होता. त्याचबरोबर 2 ऑगस्टपर्यंत चार वेळा दरवाजे उघडावे लागले होते. त्यानंतर पुन्हा वर्षभराने 3 ते 12 ऑगस्ट 2006 मध्ये 2 लाख 50 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

त्या वेळी ऊर्ध्व भागातून तब्बल 2 लाख 80 हजार क्‍युसेक पाण्याची आवक सुरू होती. त्यानंतर 12 व 13 सप्टेंबर 2008 रोजी 1 लाख 50 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या घटनेनंतर तब्बल 9 वर्षांनी गुरुवारी (ता.21) जायकवाडीतून विसर्गाची वेळ आली.

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले उस्मानाबाद मांजरा धरणाचे सहा दरवाजे शुक्रवारी (ता.22 ) सकाळी उघडण्यात आले आहेत. धरणाच्या कार्यक्षेत्रात पाऊस सुरू असून, पाण्याची आवक वाढत असल्याने पाण्याचा 148 क्‍युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या धरण 99 टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मांजरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

दृष्टिक्षेपात जायकवाडी (ता. 22)
आवक 13,984 क्‍युसेक
विसर्ग 13, 584 क्‍युसेक
पाणीसाठा 98.07 टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com