जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीत

जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीत
जळगावात गवार, हिरवी मिरची तेजीत

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात गिलके व कारल्यांची आवक नगण्यच राहिली. गिलक्‍यांची प्रतिदिन एक क्विंटल तर कारल्यांचीदेखील प्रतिदिन सव्वा क्विंटलपर्यंतची आवक झाली. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल ६५०० तर कारल्यांना प्रतिक्विंटल ५५०० रुपये दर मिळाला. 

कारल्यांसह गिलके हे वेलवर्गीय पीक आहे. जेथे बऱ्यापैकी पाणी आहे, त्याच भागात लागवड झाली आहे. लागवड यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा भागांत झाली आहे. आवक मात्र महिनाभरापासून कमीच आहे. गिलक्‍यांचे दर मागील पंधरवड्यापासून ६५०० रुपये प्रतिक्विंटल, असेच आहेत. कारल्यांची आवक मागील आठ ते दहा दिवसांत वाढली. 

कारल्यांची आवक मागील पंधरवड्यात प्रतिदिन ८० ते ९० किलोच राहिली. आवक कमी असल्याने एकच दर जाहीर होत आहे. लिलाव सकाळीच उरकले जातात. दोन-तीन अडतदारांकडे आवक होत आहे. गिलक्‍यांची आवक पुढेही फारशी वाढणार नाही, असे संकेत आहेत. 

गिलक्‍यांसह गवारचे दरही टिकून असून, आवक प्रतिदिन एक क्विंटल, अशी राहिली. दर ७००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. कूस असलेल्या गवारीची आवक अधिक होत आहे. तिला उठावही चांगला आहे. आवक जामनेर, यावल, जळगाव, पाचोरा भागांतून होत आहे. 

हिरव्या मिरचीची आवक मागील आठवड्यात प्रतिदिन नऊ क्विंटल राहिली. आवक कमी आहे. लहान, बारीक आकाराच्या तिखट मिरचीची फक्त तीन ते चार क्विंटल आवक होते. ही मिरची काही अडतदार आंध्र प्रदेशातून मागवून घेत आहेत. या मिरचीला एकच दर मिळत असून, किमान ४० रुपये प्रतिकिलोचा दर या अडतदारांना द्यावा लागत आहे. मोठ्या आकाराची कमी तिखट मिरचीदेखील येत आहे. 

परंतु, आवक कमी असतानाच उठाव बऱ्यापैकी असल्याने या मिरचीला किमान २५०० व कमाल ४००० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. जामनेर, यावल व नंदुरबारमधील मोठ्या पुरवठादारांकडून आवक होत आहे. भेंडीचे दरही टिकून आहेत. आवक मागील आठवड्यात सरासरी सहा क्विंटल प्रतिदिन अशी होती. दर २५ ते ४४ रुपये प्रतिकिलो असा मिळाला.

केळी दरात सुधारणा रावेरसह जळगाव भागात नवती केळीच्या दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी सुधारणा झाली आहे. रावेरात ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर सात-आठ दिवसांपूर्वी होते. त्यात सुधारणा होऊन ते १०२० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले. तर जळगावातील नवती केळीचे दर ९८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. रावेरात पिलबाग मधूनदेखील केळीची आवक सुरू झाली असून, पिलबागमधील केळीला प्रतिक्विंटल ९२० रुपये दर मिळत आहे. कमी दर्जाच्या, उष्णतेमुळे दर्जा घसरलेल्या वापसी प्रकारच्या केळीला रावेरात ५६० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com