‘जलयुक्त’साठी जिल्ह्यातील २०० गावांची निवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत २०१७-२०१८ साठी नाशिक जिल्ह्यातील २०० गावांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. २७) झालेल्या आढावा बैठकीत या गावांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. यंदा ‘गाव पाणलोट’ हा घटक धरून कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी क्षमता पाणलोट आराखड्याचे क्षेत्र निश्‍चित करण्यात येणार आहे. गावाच्या ‘वॉटर बजेटिंग’वरदेखील भर देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी मागील दोन वर्षांत झालेल्या कामांचा आढावाही घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्याअखेर असलेली टँकरची संख्या २५० वरून या वर्षी ७३ वर आली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षांत जिल्ह्यात एकूण २२९ गावांची निवड करण्यात आली होती.

या गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकूण ८ हजार ११० कामे पूर्ण झाली.मजगी, वनतळे, सिमेंट बंधारा आणि विहीर पुनर्भरणाच्या कामांची संख्या यात अधिक होती. पेठसारख्या दुर्गम भागात माती नालाबांधचा प्रथमच करण्यात आलेला प्रयोगही यशस्वी झाला.

एका वर्षात जलयुक्तच्या कामांसाठी एकूण १८३ कोटी ४९ लाख खर्च करण्यात आला. तसेच २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकूण २१८ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये विविध यंत्रणांद्वारे एकूण रक्कम रुपये १४१ कोटी ४२ लाखांची सहा हजारांपेक्षा जास्त कामे करण्यात आली आहेत.

नेहमी टंचाईला सामोरे जाणाऱ्या चांदवड, सिन्नर, येवला, कळवण, दिंडोरी, मालेगाव आणि सटाणा तालुक्यांत सर्वाधिक कामे घेण्यात आल्याने या तालुक्यांमधील टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी या कामांचा उपयोग होणार आहे. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने झालेल्या कामांमुळे उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे.

२०१७-१८ साठी अभियानांतर्गत २०० गावांची निवड करण्यात आली. प्रत्येक गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. ग्रामसभेच्या मान्यतेने आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गावाचा आराखडा तयार करताना एमआरसॅक आणि जीएसडीए तंत्रज्ञानाचा वापर करून क्षमता उपचार नकाशा (पोटेंशिअल ट्रिटमेंट मॅप) तयार करण्यात आले आहेत.

राज्यभरात अशा ५ हजार नकाशांचे वाटप झाले आहे. त्यामुळे कामाचे जीओ टॅगिंग करण्यास मदत होणार आहे. मागील दोन वर्षांत गावाच्या अनुषंगाने योजना राबविण्यात आली होती.या वर्षी मात्र ‘गाव पाणलोट’ हा घटक धरून कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्यासाठी क्षमता पाणलोट आराखड्याचे क्षेत्र निश्‍चित करण्यात येणार आहे. गावाच्या ‘वॉटर बजेटिंग’वरदेखील भर देण्यात येत असून, त्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. अशा सूक्ष्म नियोजनामुळे या अभियानाची उपयुक्तता आणि परिणामकारकता वाढणार आहे.

पाणीपातळीत वाढ २०१५-१६ मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेअंतर्गत शासकीय यंत्रणा आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ५९१ कामे करण्यात आली असून, ३६ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर २०१६-१७ या वर्षात ६२२ कामांतून १४ लाख ५३ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जल व मृद्संधारणाच्या कामांमुळे विहिरींच्या पाणीपातळीत सरासरी १ ते २ मीटरने वाढ झाली आहे. अभियानाच्या माध्यमातून २०१५-१६ मध्ये ३७ हजार २८८ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. एकूण ७४ हजार ५७६ हेक्टर एक पाळी संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. तर २०१६-१७ मध्ये २४ हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. परिसरातील विहिरींची पाणीपातळी सरासरी एक मीटरने वाढली. एकूण ४८ हजार हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com