नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा हजार कामे पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८ वर्षातील ६५९८ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ४८ कोटी १९ लाख रुपये यासाठी खर्च झाले असून ९८ कोटी ४३ लाख रुपयांची कामे २४१ गावांत सुरू आहेत. २०१८-१९ मध्ये निवडलेल्या गावांतील कामाबाबत मात्र अजून हालचाली नाहीत.

ग्रामीण भागातील टंचाईमुक्तीसाठी दोन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. ती यशस्वी करण्याची सर्वस्वी जबाबदारी कृषी विभागाची आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ‘जलयुक्त’च्या कामांबाबत गांभिर्याने घेतलेले आहे. कामे पूर्ण करण्यासह कामांचे जिओ टॅगिंग करण्याबाबत ते सातत्याने सूचना देत आहे. जिल्ह्यामध्ये पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६८ आणि यंदा २४१ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली असून, यंदा उर्वरित सर्व २४९ गावांचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे. पहिल्या दोन वर्षांत तीनशे कोटींपेक्षा जास्त खर्च योजनेवर झाला.

या वर्षी निवडलेल्या २४१ गावांमध्ये ८ हजार ३० कामे नियोजित आहेत. यातील आराखडातील अनेक कामात बदल झालेले आहेत. २४१ गावांत आतापर्यत सर्व ८०३८ कामांना तांत्रिक तर ८००५ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ४१०३ कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. ७८८९ कामांना कार्यारंभ आदेश दिले असून ७८०८ कामे सुरू झाली आणि त्यातील ६५९८ कामे पूर्ण झाली.

या कामावर आतापर्यंत ४८ कोटी १९ लाख ६६ हजार रुपये खर्च झाले आहेत. मागील पाच वर्षांचा विचार करता, पाणी टंचाईची स्थिती गंभीर होती. गेल्या वर्षी व यंदा ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या गावांमध्ये टंचाईचे प्रमाण नगण्य आहे. ‘जलयुक्त’मधून जास्तीत जास्त कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार अभियान ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यात सहभागी गावांसह पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. योजनेत भरीव काम करणाऱ्या गावांसोबत पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हे पुरस्कार रखडले आहेत. पहिल्या एका वर्षाचे (२०१५-१६) पुरस्कार वितरण झाले. त्यानंतर २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांसाठीच्या पुरस्काराबाबत अजून कसल्याच हालचाली सुरू दिसत नाहीत. ‘जलयुक्त’ची जबाबदारी असलेला कृषी विभागही त्याबाबत अनभिज्ञ आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com