नगरमध्ये ‘जलयुक्त’ची साडेपाच हजारांवर कामे पूर्ण

जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार

नगर   ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्यावर्षी (२०१७-१८) निवड झालेल्या २४१ गावांत आतापर्यंत ७५२३ कामे सुरू झाली आहेत. त्यातील ५५६७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर आतापर्यंत ४४ कोटी ६१ लाख रुपये खर्च झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात मागील वर्षांत २४१ गावांची निवड झालेली आहे. या गावांतील कामे वेगाने करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मागील दोन वर्षांत (२०१५-१६ व २०१६-१७) झालेल्या कामांचे परिणामही आता दिसत आहेत. अभियानात पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २५६ गावे निवडली गेली. या दोन वर्षांत जवळपास ३२५ कोटींची २५ हजारांवर कामे केली गेली. लोकसहभाग वाढल्याने कामांना गती आली. या दोन वर्षांतील कामे अजून काही ठिकाणी सुरू आहे.

यंदा मार्चअखेरपर्यंत दोन वर्षांतील मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र कामे झाली नसल्याने ती करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे. गेल्यावर्षी (२०१७-१८) २४१ गावांची निवड करण्यात आली असून या गावांत ८१६१ कामे मंजूर आहेत. मंजूर कामांपैकी आतापर्यंत ९७ कोटी ४० लाखांची कामे सुरू झाली आणि त्यातील ४४ कोटी ६१ लाखांची कामे पूर्ण झाली आहेत.

यंदा पाऊस लांबल्याने कामे पूर्ण होण्याला मदत झाली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडील नाला खोलीकरणावर बांबू लागवडीची ७०१ कामे लोकसहभागातून होणार असल्याने ती कामे आराखड्यातून कमी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियानात गेल्यावर्षी निवडलेल्या २४१ गावांसाठी ८१६१ कामांचा १९८ कोटी ८९ लाखांचा आराखडा करण्यात आला होता. त्यातील ८०६० कामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. ७७४० कामांना कार्यारंभ आदेश दिलेले असून ७५२३ कामे सुरू झाली. त्यातील ५५६७ कामे पूर्ण झाली आणि १९५६ कामे सुरू आहेत. आराखड्यानुसार जूनपर्यंत कामे पूर्ण करावीत, असे प्रशासनाने आदेश दिलेले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com