सोलापुरात ‘जलयुक्त’च्या कामांचा वेग मंदावला

जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार
सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामध्ये सर्वाधिक आघाडी असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील कामांचा यंदाच्या वर्षीचा वेग मात्र बराच मंदावला आहे. अभियानाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षी ज्या गतीने कामे झाली होती त्या गतीने आता कामे होताना दिसत नाहीत. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी ज्या तडफेने आणि धडाडीने या अभियानासाठी काम केले, त्याची फलनिष्पत्ती झाली, ती आता पुन्हा होईल का नाही, अशी शक्‍यता कमी आहे.
 
जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर आढावा बैठका, कामांच्या मंजुरी या पलीकडे फारशा हालचाली दिसत नाहीत. प्रत्यक्षात लोकांचे प्रबोधन आणि त्यांची मान्यता आणि वाढता लोकसहभाग या योजनेमध्ये आवश्‍यक आहे. पण त्याबाबतही काहीसे संदिग्ध चित्र आहे. यंदा जिल्ह्यात झालेला मुबलक पाऊस, शंभर टक्के भरलेले उजनी धरण आणि जलयुक्त शिवारला दिलेली तंत्रज्ञानाची जोड याचा परिणाम यंदाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांवर झालेला दिसत आहे, पण हे किती काळ टिकणार आहे, याचा विचार होण्याची गरज आहे.
 
तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम केले. ते स्वतः या सगळ्या कामावर लक्ष ठेवत. त्यामुळेच सलग दोन वर्षे २०१५ व २०१६ मध्ये या अभियानाला सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या अभियानाला लोकसहभागाची भक्कम जोड मिळाल्याने जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली, पण नंतर त्यात संथगती आली आहे.
 
यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. यापूर्वी झालेल्या ‘जलयुक्त’च्या कामांमुळे शिवारातील पिके डोलू लागली आहेत. शिवारात पिके असल्यानेही ‘जलयुक्त’च्या कामांना अडथळा होऊ लागला आहे. २०१७ हे वर्ष ‘जलयुक्त’च्या कामासाठी जेमतेमच ठरले. आता या वर्षी तरी प्रशासनाने अंग झटकून काम करण्याची गरज आहे. 

२०१५-१६ व २०१६-१७ वर्षांत सोलापूर जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे चार लाख १३ हजार ७१० टीसीएम एवढी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. जिल्ह्यात यंदा ६१२ मिमी पाऊस झाल्याने विहिरींच्या पाणीपातळीत सरासरी तीन मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन सिंचनांसाठी एकूण एक लाख ५१ हजार ५८० हेक्‍टरसाठी संरक्षित पाणीसाठा निर्माण झाला आहे.

 प्रस्तावित आराखडा
  • कामांची संख्या  - १५,०३६
  • रक्कम - २५२ कोटी ४७ लाख
  • गावांची संख्या -  २६५.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com