सातारा जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची ४९६२ कामे पूर्ण

जलयुक्त शिवार योजना
जलयुक्त शिवार योजना
सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतंर्गत असलेली कामे मुदतीत पूर्ण करण्यास गती आली आहे. या योजनेतंर्गत २०१६-१७ मधील ४६८४ तर २०१७-१८ मधील २७८ अशी एकूण ४९६२ कामे पूर्ण झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात (२०१६-१७ मध्ये) २१० गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. या गावांमध्ये एकूण ५४४८ कामे निश्‍चित करण्यात आली होती. या कामांसाठी १९७ कोटी २६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. या सर्व कामांचा शासकीय यंत्रणांमार्फत आराखडा तयार करण्यात आला होता.
 
त्यामध्ये सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझरतलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्तीची कामे, नदी पुनरुज्जीवन आदी कामे हाती घेतली गेली. आजवर ४६८४ कामे पूर्ण झाली असून ३८९ कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेली व प्रगतिपथावर असलेल्या कामांसाठी आतापर्यंत १०८ कोटी १६ लाख रुपये खर्च झाले आहेत.
 
२०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २१० गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये ३७८४ कामे निश्‍चित करण्यात आली आहेत. या कामांसाठी १०९ कोटी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. एकूण कामांपैकी आज अखेर २७८ कामे पूर्ण झाली असून ८४ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांसाठी तीन कोटी १० लाख रुपये खर्च झाला आहे. 
 
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुष्काळी गावांतील कामे लवकर पूर्ण व्हावी यासाठी मुदत देण्यात आली आहे. २०१६-१७ मधील कामांसाठी या महिन्याअखेर (मार्च) पर्यंत मुदत आहे. प्रगतिपथावर असलेली ३८९ व  शिल्लक असलेली ३७५ कामे मार्च अखेर पूर्ण करावी लागणार आहेत.
 
२०१७-१८ मधील कामांना जून २०१८ अखेरची मुदत आहे. या कालावधीतील प्रगतिपथावर असलेली ८४ कामे तर शिल्लक ३५०६ कामे जून अखेर पूर्ण करण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com