शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्र

प्रयोगशील शेतकऱ्यांचा ‘कृषी दीपस्तंभ’ पुरस्काराने सन्मान
प्रयोगशील शेतकऱ्यांचा ‘कृषी दीपस्तंभ’ पुरस्काराने सन्मान

अकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत ‘जय गजानन कृषी मित्र परिवार` ही संस्था स्थापन केली. या माध्यमातून शेती, आरोग्य तसेच ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या चार वर्षांत संस्थेने अकोला जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेती तसेच पूरक उद्योगाला चालना दिली आहे.   

विदर्भाच्या बरोबरीने राज्य, परराज्यात संत गजानन महाराज यांचे अनेक भक्त आहेत. अकोला शहरातील जय गजानन कृषी मित्र परिवार या संस्थेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात भक्ती आहे, पण ती डोळस स्वरूपाची आहे. समाजाची सेवा करूनसुद्धा आपली भक्ती होऊ शकते, हे प्रत्येकाला वाटते. सन २०१५ मध्ये अकोला शहरातील सुमारे ६५ जणांनी अकोला ते शेगाव अशी पायी वारी केली होती. त्या वेळी झालेल्या चर्चेतून परिवाराची संकल्पना उदयास आली. ६५ सदस्यांपासून सुरू झालेला हा परिवार सातत्याने विस्तारत असून सध्या ४५० सदस्य जोडलेले आहेत. या सदस्यांची दर गुरुवारी न चुकता बैठक होते. अर्ध्या तासाच्या बैठकीत आत्तापर्यंत झालेल्या बाबींची अंमलबजावणी, पुढील कामांबाबत धोरण आखले जाते.  संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणीही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव नाही. फक्त एका जणाकडे कोशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. ही व्यक्ती संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळते. ज्यांना शेतकरी आणि ग्रामीण उपक्रमांविषयी आपुलकी आहे असे कृषी केंद्रांचे संचालक, उद्योजक, नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी, सामान्य नागरिक या परिवाराचे सदस्य आहेत.

श्रमदानातून मदत   संस्थेने बार्शिटाकळी तालुक्‍यातील सिंदखेड मोरेश्‍वर या गावातील मोर्णा नदीवर बांध उभारला. त्यासाठी परिवारातील ७० सदस्यांनी श्रमदान केले. बंधारा उभारल्याने जमिनीत पाणी मुरले. पाणी साचल्याने परिसरातील कूपनलिका, विहिरींची पाणी पातळी वाढली. शहरातील लोक गावात येऊन श्रमदानातून बंधारा बांधतात हे पाहून गावकरीदेखील श्रमदानासाठी पुढे आले.

माती परीक्षणासाठी पुढाकार  जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. पीक व्यवस्थापन करताना जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये किती आहेत, याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी माती परीक्षण उपक्रम बारा गावांमध्ये घेण्यात आला. या उपक्रमासाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर कंपनीने सहकार्य केले. याचबरोबरीने इक्रीसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत विविध उपक्रमांचे नियोजन संस्थेने केले आहे. इक्रीसॅटनेही विविध गावांतील शेतकऱ्यांचे माती नमुने गोळा करून त्याचा अहवाल दिला. विविध हंगामामध्ये पेरणीपूर्व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते. 

पीक उत्पादनवाढीसाठी प्रकल्प  जय गजानन परिवार ही संस्था इक्रीसॅट सोबत अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत पीक उत्पादनवाढ प्रकल्पासाठी काम करीत आहे. याअंतर्गत जमीन मशागतीसाठी अवजारे पुरविण्यात येतात. याचबरोबरीने सोयाबीन, मूग, उडीद, तूर बियाणांचे अनुदानावर वाटप करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पिकाचे शेंडे खुडणीसाठी यंत्र, कापूस अवशेष नष्ट करणारे यंत्र शेतकऱ्यांना दिले जातात.

कापूस यांत्रिकीकरण प्रकल्प  संस्थेने मागील हंगामापासून कापूस यांत्रिकीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. कापसाची शेती ही कमीत कमी मनुष्यबळात व्हावी, शेतकऱ्याला हमखास उत्पादन मिळावे, नफ्याचे प्रमाण वाढावे यासाठी कापूस यांत्रिकीकरण प्रकल्पाची सुरवात झाली. यावर्षी अकोला जिल्ह्यातील १३०० एकरात हा प्रकल्प राबवला जात आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहा कृषी पदवीधरांची नेमणूक करण्यात आली आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस मदत  अकोला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस उपजीविकेचा आधार व्हावा तसेच त्यांच्या मुलांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शेतकरी परिवारास मदत केली जाते. गावपातळीवर धान्य स्वच्छ करण्याची सुविधा व्हावी या उद्देशाने संस्थेने ६५ हजार रुपये किमतीचे धान्य स्वच्छ करण्याचे यंत्र वरखेड गावातील एका गरजू कुटुंबाला दिले आहे. यासाठी अकोल्यातील  एका कंपनीने मदत केली.

फवारणीसाठी ‘सेफ्टी किट`चा आग्रह  सध्या किटकनाशकाच्या विषबाधेचा विषय सगळीकडे गाजत आहे. जय गजानन परिवाराने शेतकऱ्यांच्यामध्ये किटकनाशकाच्या फवारणीबाबत जागृती करण्याचे काम पहिल्यापासूनच केले आहे. किटकनाशक, तणनाशक फवारणी करताना, हाताळणी करताना जर काही चुकीची घटना घडली तर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत अकोला जिल्ह्यातील सतरा गावांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबरीने फवारणीसाठी लागणाऱ्या ‘सेफ्टी किट`चे वाटप करण्यात येते. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे कुटुंबाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे याची माहिती गावातील लोकांना दिली जाते. संस्थेच्या उपक्रमाचा तीनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. 

संस्थेतर्फे शेतकऱ्यांचा सन्मान   दरवर्षी रोटरी क्‍लब ऑफ अकोला आणि जय गजानन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शेती आणि प्रक्रिया उद्योगामध्ये प्रयोगशीलता जोपासणाऱ्या शेतकऱ्याचा ‘कृषी दीपस्तंभ` पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. दरवर्षी या पुरस्काराचा लौकिक वाढत आहे. भविष्यात हा पुरस्कार विदर्भस्तरावर देण्याचे संस्थेचे नियोजन आहे.

डोळे तपासणी शिबिर   अकोला शहरातील रोटरी क्‍लबसोबत संस्था आरोग्यविषयक उपक्रम संयुक्तरीत्या राबवते. मुंबई येथील रोटरी हॅंगिंग गार्डन क्‍लब, दम्माणी नेत्र रुग्णालय आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तांदळी गावात नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा शेतकरी कुटुंबातील पाचशे जणांनी लाभ घेतला. या शिबिराच्या माध्यमातून १५४ जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.   

मोबाईलच्या कव्हरमध्ये माहिती कार्ड  आज प्रत्येकाचे जीवन गतिशील झाले आहे. अनेकदा अपघात होतात. अशावेळी कुटुंबीयांशी संपर्क साधताना अडचणी येते. ही बाब छोटीशी असली तरी महत्त्वाची आहे. त्यामुळे संस्थेने  वैयक्तिक माहिती, रक्तगट, मोबाईल क्रमांक, नातेवाइकांचा संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती असलेले छोटे कार्ड तयार केले. संस्थेच्या प्रत्येक सदस्याच्या मोबाईल कव्हरमध्ये हे माहिती कार्ड असते. दरवर्षी अशा प्रकारची हजारो कार्ड ही संस्था सेवाभावी वृत्तीने लोकांना वितरित करते.

- मोहन सोनोने, ९४२२१६३५१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com