गाव तेथे तलाव योजना ‘मनरेगा’मधून राबविणार : जयकुमार रावल

मंत्री जयकुमार रावल
मंत्री जयकुमार रावल

मुंबई : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात आता ‘मनरेगा’ योजनेतून मागणीनुसार ‘गाव तेथे तलाव’ ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सामानाची वाहतूक करणे सुलभ होण्याच्या दृष्टीने मनरेगा आणि शासनाच्या इतर योजनांच्या एकत्रित सहभागातून शेत रस्ते तथा पाणंद रस्ते तयार करण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात केली.  या वेळी ‘रोहयो’ आणि जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे उपस्थित होते.  मंत्री श्री. रावल म्हणाले की, पावसाअभावी राज्याच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. रोहयो विभागाने रोजगार निर्मितीचे संपूर्ण नियोजन केले आहे. या योजनेतून सध्या राज्यात ३५ हजार ७४० कामे सुरू असून त्यावर १ लाख ५४ हजार १३८ इतके मजूर काम करीत आहेत. योजनेसाठी सध्या भरीव निधी उपलब्ध असून मागणीप्रमाणे सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. श्री. रावल म्हणाले, शेत रस्त्यांच्या कामासाठी मनरेगासह इतर विविध योजनांचा निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. मनरेगातील कुशल - अकुशलचा निधी आणि इतर योजनांचा निधी यामधून पक्क्या शेत रस्त्यांची निर्मिती करण्यात येईल. चौदावा वित्त आयोग, आमदार निधी, खासदार निधी, गौण खनिज विकास निधी, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी मिळणारे अनुदान, जिल्हा योजना, महसुली अनुदान, पेसाअंतर्गत उपलब्ध होणारा निधी इत्यादी विविध योजनांचे मनरेगासह अभिसरण करून शेत रस्ते तयार करण्यात येतील. ही योजना राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दीड कोटी रुपयांप्रमाणे ३४ जिल्ह्यांना ५१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे. शेत रस्ते तयार करण्यासाठी विशेष बाब म्हणून गौणखनिज स्वामित्व शुल्कामध्ये सूट देण्यात येत आहे. मोजणीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर मोजणी करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, रस्ता बांधकाम यासाठी देण्यात येणाऱ्या पोलिस बंदोबस्तासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही मंत्री श्री. रावल यांनी या वेळी जाहीर केले. गावकऱ्यांची मागणी आल्यास मनरेगातील कुशल-अकुशल निधी वापरून ‘गाव तेथे तलाव’ ही योजना राबविण्यात येईल. मनरेगामधून ही योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. नवीन २८ कामांचा समावेश मनरेगामधून आता शाळेसाठी संरक्षक भिंत तसेच साखळी कुंपण बांधणे, खेळाच्या मैदानासाठी संरक्षक भिंत तसेच साखळी कुंपण बांधणे, छतासह बाजारओटा बांधणे, शालेय स्वयंपाकगृहासाठी निवारा बांधणे, नाला-मोरीचे बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम बांधणे, सिमेंट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, डांबर रस्ता, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, बचतगटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे, स्मशानभूमी शेड बांधकाम, नाडेप कंपोस्ट, सामूहिक मत्स्यतळे, सार्वजनिक जागेवरील शेततळे, काँक्रीट नाला बांधकाम, पीव्हीसी पाईप निचरा प्रणाली, भूमिगत बंधारा, सिमेंट नाला बांध, कॉम्पोझीट गॅबीयन बंधारा आदी नवीन २८ कामेही करण्यात येणार आहेत. मनरेगामधून या योजनांसाठी प्रामुख्याने मजुरांचा पुरवठा तसेच कुशल योजनेचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री श्री. रावल यांनी या वेळी दिली. राज्याचे वैभव असलेल्या गड किल्ल्यांची डागडुजी, स्वच्छता आदी कामेही मनरेगामधून करण्यास आता मान्यता देण्यात आली आहे. गड किल्ल्यांची स्वच्छता करणे, अडगळ दूर करणे, तलावांची साफसफाई, झाडे लावणे, डागडुजी आदी कामे करून या किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. रावल यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com