कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या केंद्रांना नकार

कापूस खरेदी
कापूस खरेदी

जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रांसंबंधी जिनर्सनी निविदांना प्रतिसाद दिला. परंतु ‘सीसीआय’ने प्रतिगाठ ८६० रुपयांपेक्षा अधिक दर देणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर जिनर्सनी हे दर परवडणारे नाहीत. किमान १२५० रुपये प्रतिगाठ, असे दर द्यावेत, अशी मागणी केली. पण ‘सीसीआय’ने दरवाढीस नकार दिला. यामुळे जिनर्स व ‘सीसीआय’ यांच्यातील खरेदी केंद्रासंबंधीची वाटाघाटी फिस्कटली आहे. ही वाटाघाटी अयशस्वी झाल्याने ‘सीसीआय’ची कापूस खरेदीही लटकल्याची स्थिती असून, खरेदीचा मुहूर्त निघेल केव्हा, असा प्रश्‍न कायम आहे.  खाजगी जिनींग कारखान्यात खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी ‘सीसीआय’ने सहा वेळेस निविदा प्रक्रिया राबविली. पाच निविदा प्रक्रियांना सीसीआय’ने लागू केलेल्या नव्या अटी व शर्ती यामुळे प्रतिसाद मिळाला नाही. नंतर `सीसीआय’ने वाटाघाटींमध्ये तडजोडीची भूमिका घेत सहावी निविदा प्रक्रिया राबविली. परंतु वाटाघाटींमध्ये जिनर्सने अपेक्षित दर मिळत नसल्याने या प्रक्रियेतून बाहेर राहणे पसंत केले आहे. १५ ऑक्‍टोबरपर्यंत सहावी निविदा प्रक्रिया राबविली. ६४ केंद्रांसाठी सुमारे ९२ निविदा आल्या. संबंधित निविदाधारक जिनर्सना मंगळवारी (ता.१६) औरंगाबाद येथील वीर सावरकर चौक भागातील ‘सीसीआय’च्या चांद्रमौळी इमारतीमधील कार्यालयात दर, करार प्रक्रिया व इतर कार्यवाहीसंबंधी बोलाविण्यात आले. तेथे दुपारी ‘सीसीआय’चे मराठवाडा, खानदेश (नगर, नाशिकसह) मुख्य महाव्यवस्थापक एस. के. दास यांच्यासोबत जिनर्सची बैठक झाली. जिनर्सनी महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनच्या नेतृत्वात या वाटाघाटीत सहभाग घेतला. असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल यांनी चर्चा केली. 

निर्यातक्षम रुईपेक्षाही कडक नियम का? ‘सीसीआय’ने ८ टक्‍क्‍यांच्या आर्द्रतेचाच कापूस असावा, गाठींमध्ये अडीच टक्केच ट्रॅश (कचरा वगैरै) असावा हा अतिशय जाचक निकष यंदा लावला आहे. निर्यातक्षम रुईसाठी तीन ते साडेतीन टक्के ट्रॅश, नऊ टक्‍क्‍यांवर आर्द्रता स्वीकारार्ह मानली जाते. तसेच जुने निकष पुन्हा लागू करून खरेदी केंद्रांची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी जिनर्सनी केली.  सातवी निविदाही काढणार नाही ‘सीसीआय’ने सहा निविदा प्रक्रिया राबविल्या. आता पुढील आदेश येईपर्यंत नव्याने वाटाघाटीसाठी जिनर्सशी बोलणी होणार नाही. तसेच पुढे सातवी निविदा प्रक्रियाही राज्यात राबविली जाणार नाही, असे ‘सीसीआय’च्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. खरेदी केंद्रासंबंधीची वाटाघाटी फिस्कटल्याने ‘सीसीआय’ची कापूस खरेदी अनिश्‍चित स्थितीत असून, खरेदीचा मुहूर्त केव्हा लागेल, असा प्रश्‍न कायम आहे.  जिनर्सनी मागितला ११०० रुपयांवर दर ‘सीसीआय’ने जिनर्सना प्रतिगाठ ८६० रुपये दर देऊ, असे स्पष्ट केले. त्याला जिनर्सनी नकार दिला. आंध्र प्रदेश व तेलंगणात `सीसीआय’ने दर प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिनिंगमध्ये खरेदी केंद्रांसंबंधीचे करारही सुरू असून, पुढील आठवड्यात तेथे खरेदी सुरू होईल. तेथे ११३४ (तेलंगण) व आंध्र प्रदेशात १११४ रुपये प्रतिगाठ, असे दर जिनर्सना दिले. राज्यात १२५० रुपये प्रतिगाठ, या दरांपेक्षा कमी दरात जिनर्स काम करणार नाहीत, अशी मागणी जिनर्सनी केली. परंतु ‘सीसीआय’ने नकार दिला. यामुळे वाटाघाटी यशस्वी झाली नाही. विदर्भासाठी ८५० रुपये दर विदर्भातही खरेदी केंद्रांसाठीची निविदा प्रक्रिया पार पाडून जिनर्सना अकोला येथे बोलावून ‘सीसीआय’च्या अधिकाऱ्यांनी दरांबाबत वाटाघाटी केली. तेथे प्रतिगाठ ८५० रुपये दर दिले. तेथेही जिनर्सनी हे दर अमान्य केले. नंतर ‘सीसीआय’च्या काही अधिकाऱ्यांनी जिनर्सना व्यक्तिगत मोबाईलवर संपर्क साधून दर मान्य करण्याची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनमधी सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com