पुणे विभागात पाण्याअभावी ज्वारीचे पीक सुकतेय

माझ्याकडे एकूण साडेतीन एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरांवर ज्वारीची पेरणी केली होती. जूनपासून पाऊस झाला नाही. जमिनीत ओल राहिली नाही. परतीचा पाऊस होण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके जळून गेली आहेत. - ताराचंद थोरात, सोनवडी सुपे, ता. बारामती, जि. पुणे.
पाण्याअभावी ज्वारी पिकाचे नुकसान
पाण्याअभावी ज्वारी पिकाचे नुकसान

पुणे   ः कमी पावसामुळे रब्बी ज्वारीला चांगलाच फटका बसला आहे. सध्या पाण्याच्या सुविधा असलेल्या ठिकाणी ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, ज्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी पिके सुकत असून ती जळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर होण्याचा अंदाज आहे.

पावसाळ्यातील चार महिन्यांत पुणे विभागात अत्यंत कमी पाऊस पडला. काही तालुक्यांत पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे शेतकरी परतीच्या पावसावर अवलंबून होते. मात्र, परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल होऊ शकली नाही. पुणे विभागात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र सुमारे १३ लाख ५ हजार ४०७ हेक्टर असून त्यापैकी तीन लाख ३५ हजार ५४७ हेक्टरवर म्हणजेच २६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

ज्वारीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हयात रब्बी ज्वारीची अत्यंत कमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र पाच लाख ८८ हजार ६९८ हेक्टर असून त्यापैकी एक लाख ३५ हजार ३६८ हेक्टर म्हणजेच २३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चार लाख ५३ हजार ३३० हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिले आहे. यंदा उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांत ज्वारी पेरणीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्टर असून त्यापैकी अवघ्या ६१ हजार ७३७ हेक्टरवर म्हणजेच २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी बारामती, इंदापूर, शिरूर, पुंरदर, खेड या तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जिल्हयात ज्वारीचे एक लाख ८५ हजार १८७ हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे. नगर जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, जामखेड, नेवासा, कर्जत, नगर, पारनेर, श्रीगोंदा ही तालुके रब्बी ज्वारीचे तालुके ओळखले जातात. यंदा या तालुक्यांत पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पेरणी होऊ शकली नाही.

यंदा चार एकरांत ज्वारी व तीन एकरांत हरभरा पिके घेतली होती. चालू वर्षी परतीचा पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके जळून गेली आहेत, असे नगर जिल्ह्यातील भालगाव (ता. पाथर्डी) येथील शेतकरी  हरिभाऊ खेडकर यांनी सांगितले.

जिल्हानिहाय रब्बी ज्वारीचे पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा  सरासरी क्षेत्र   पेरणी झालेले क्षेत्र
नगर ४,६९,७८५ १,३८,४४२
पुणे २,४६,९२४  ६१,७३७
सोलापूर ५,८८,६९८  १,३५,३६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com