ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक

ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक

परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन पिकांचे एकूण पेरणी क्षेत्र १ लाख ४० हजार ५४० हेक्टर असताना शेतकऱ्यांनी २ लाख ३२ हजार २३४ हेक्टरवरील पिकांसाठी विमा कवच घेतले आहे. या तीन पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र ९१ हजार ६९४ हेक्टरने जास्त झाले आहे. यामुळे विमा नुकसान भरपाई मंजूर करताना क्षेत्र सुधार गुणांक लागू होऊन पिकांसाठी घेण्यात आलेल्या एकूण विमा संरक्षित रकमेच्या तुलनेत कमी दराने परतावा मिळणार आहे. याचा फटका अनेक मंडळांतील शेतकरी बसणार आहे. पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्राच्या पडताळणीनंतर पीक पेऱ्याची खोटी माहिती आढळून आलेल्या संबंधितांवर गुन्हे दाखल होऊ शकतात.

यंदाच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल आदी पिकांची मिळून एकूण १ लाख ६८ हजार ४९० हेक्टरवर पेरणी झाली. एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे पेरणी क्षेत्रामध्ये मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे दुष्काळामुळे विमा नुकसान भरपाई मिळण्याची दाट शक्यता मानून यंदा जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी एकूण २ लाख ४९ हजार २८ हेक्टरवरील पिकांसाठी ६१७ कोटी ७७ लाख ९४ हजार ९६६ रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. एकूण ४ लाख १ हजार ९३९ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले असून शेतकऱ्यांनी ९ कोटी २६ लाख ६६ हजार ७६० रुपये विमा हप्ता भरला आहे. परभणी, पालम, पूर्णा तालुक्यामध्ये पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र कमी आहे.

परंतु जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या सहा तालुक्यांमध्ये पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गव्हाच्या पेरणी २३ हजार ६४३ हेक्टर आहे. तर विमा संरक्षित क्षेत्र १६ हजार ५७५ हेक्टर आहे. परंतु ज्वारीची ८३ हजार ९७० हेक्टरवर पेरणी झालेली असताना १ लाख १० हजार १९१.२१ हेक्टरसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यात आले. हरभऱ्याची ५३ हजार ८२७ हेक्टरवर पेरणी झालेली असताना १ लाख ३८८.७८ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले आहे. करडईची २ हजार ७४३ हेक्टरवर पेरणी झालेली असताना २१ हजार ६५४.८३ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेण्यात आले आहे.

परभणी जिल्हा तालुकानिहाय पेरणी क्षेत्र, विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका पेरणी क्षेत्र विमा संरक्षित क्षेत्र विमा प्रस्ताव
परभणी ३४०८३ ३३८३८.५६ ४२१४१
जिंतूर १७८७५ ३२३२७.९० ५७६६२
सेलू २६६०५ ३४५३५.४२ ५८६७७
मानवत १०१३४ २००१५.७३ २७९००
पाथरी ९७३१ २५८५३.९७ ३९५४६
सोनपेठ ५५४० २३७५४.५८ ३४३६१
गंगाखेड २०८७५ ४२३०९.६२ ७३९३९
पालम २६३७६ २६२७३.१४ ५२१८०
पूर्णा १७२७० १०१०९.८० १५५३३

पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक असल्याने नुकसानभरपाई कमी मिळू शकते. पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्राच्या पडताळणीनंतर पीक पेऱ्याची खोटी माहिती सादर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. - बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com