नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीचे उत्पादन घटले

नगर बाजार समितीत नगरसह सोलापूर, बीड, औरंगाबाद, उस्मानाबादसह राज्याच्या काही भागांतून ज्वारीची आवक होत असते. यंदा आवकेचे प्रमाण अल्प आहे. कित्येक वेळा आवकही होताना दिसत नाही. गंभीर दुष्काळाचा परिणाम ज्वारीच्या आवकेवर झाला आहे. - अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः उसासोबत ज्वारीचे आगार म्हणून ओळख असलेल्या नगरसह राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर भागांत यंदा ज्वारीचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटले. गंभीर दुष्काळाचा हा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. उत्पादकता घटल्याने नगर बाजार समितीतही ज्वारीची आवक कमालीची घटली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सत्तर टक्के आवक कमी झाली आहे. मात्र सात वर्षांच्या तुलनेत यंदा उच्चांकी दर मिळाला असल्याचे ज्वारी आवकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले. 

नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असल्याने उसाचे क्षेत्र अधिक असते. मात्र रब्बीत ज्वारीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात असते. प्रशासनाच्या नोंदीनुसार पावणे पाच लाख हेक्टर क्षेत्र ज्वारीचे आहे. मात्र साडेपाच, पावणे सहा लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत ज्वारीचा पेरा होत असतो. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, नगर, शेवगाव तालुक्यासह उत्तर भागातील संगमनेर, कोपरगाव, नेवासा भागांत ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. अनेक भागात रब्बीतील ज्वारीचे पीक महत्त्वाचे असून, त्यावरच शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. नगर व शेजारच्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचे क्षेत्र जास्त राहत असल्याने नगर बाजार समितीत ज्वारीची आवकही लक्षवेधी असते.

यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीचे आगार करपले आहे. खरिपात पिके आली नाहीत आणि रब्बीत पन्नास टक्के क्षेत्रावरही पेरणी झाली नाही तर जेथे पेरले तेथे पीक आलेच नाही. त्याचा परिणाम बाजार समितीमधील ज्वारीच्या आवकेवर परिणाम झालेला दिसत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा तीस टक्केही आवक झाली नाही असे बाजार समितीच्या आवक अहवालातून दिसून येत आहे. दुष्काळात ज्वारीची आमदनी दुपटीने कमी झाल्याने शेतकऱ्यांना यंदा आर्थिक फटका बसला आहे.

जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनाला प्राधान्य दिले जाते. दूध व्यवसायात ज्वारीचा चारा (कडबा) महत्त्वाचा मानला जातो. यंदा मात्र कडबा चारा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. त्यात सध्या ऊसाचा चारा दिला जात आहे. त्यासोबत भुसा, कडबा देण्याचे आदेश आहेत. मात्र कडबाच उपलब्ध नसल्याने कोणत्याही छावणीत कडबा दिसत नाही.    

नगर येथे वर्षनिहाय ज्वारीची आवक व दर
वर्ष  आवक (क्विंटल) किमान दर कमाल दर
२०१३-१४  २९,५४८  १५२०  २९०१
२०१४-१५   १.०६,९१२  १५५१ ३१००
२०१५-१६ ३०,५१२ १६०० ३१००
२०१६-१७   ४६५५२   १६००   ३०००
२०१७-१८ २८,४८३  १३०० २९००
२०१८-१९ १०,९८१ १२०० ४००० (मार्चअखेर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com