मृग बहरही संकटात

संत्रा बागा बहरण्यास अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने या वर्षी मृग बहरातील समस्या वाढल्या आहेत. मृग बहरातील उत्पादकता यामुळे प्रभावित होणार असल्याने तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा आहे. - मनोज जवंजाळ, काटोल, ता. जि. नागपूर
वंडली, काटोल, जि. नागपूर ः रामराव महाराज ढोक यांच्या बागेत केवळ नवीन पाने आली; फुलधारणा मात्र झाली नाही.
वंडली, काटोल, जि. नागपूर ः रामराव महाराज ढोक यांच्या बागेत केवळ नवीन पाने आली; फुलधारणा मात्र झाली नाही.

काटोल, जि. नागपूर ः आंबिया बहरात अवकाळीचा फटका बसला, त्यामुळे संत्रा उत्पादकांना मृग बहरात चांगल्या उत्पादनाची आशा होती. मात्र जास्त उष्णता आणि सलग पाऊस यामुळे बागा बहरण्यास अनुकूल वातावरण तयार होत नसल्याने या वर्षी मृग बहरही संकटात सापडला आहे. उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे संत्र्याचे दर चांगलेच वाढण्याचे शक्यता असल्याचे जाणकार सांगतात. आंबीया बहरातील संत्र्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्याच्या परिणामी उत्पादकता कमी झाली. त्यानंतर संत्रा उत्पादकांचे लक्ष्य मृग बहराकडे लागले होते. परंतु अनेक संत्रा बागा उष्णतेच्या अपोषक वातावरणाने वाळल्याने आता मृग बहरही धोक्‍यात आला आहे. दरवर्षी मे महिन्याच्याअखेर रोहिणी नक्षत्रात पाऊस येण्याचे प्रमाण कमीच असते. परंतु गेल्या काही वर्षांत वातावरणातील बदलाच्या परिणामी संत्रा बागा बहरण्यास अनुकूल वातावरण तयार होत नसल्याचे चित्र असल्याचे जाणकार सांगतात. पावसाने जुलै महिन्यात सलग हजेरी लावली असली तरी झाडाची ऊब निघून गेल्याने त्या थंडावल्या, सरळ कोपल वाढली. या ऋतूतच नवीन फुटणाऱ्या पालवीत फुलांची धारण होते, मात्र बहुतेक बागांमध्ये नवतीत केवळ पानेच आली. त्यांचा फटका संत्र्यासोबतच मोसंबीलादेखील बसला आहे. 

नागपूर, अमरावती सोबतच लगतच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा, सौंसर, पांढुर्णा या जिल्ह्यांतदेखील संत्रा लागवड क्षेत्र आहे. या भागातदेखील वातावरणातील बदलाचा संत्रा बागांना फटका बसला आहे. परिणामी संत्र्याचे दर या वर्षी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मागील वर्षीचा आढावा घेता संत्र्याचे दर मे महिन्याअखेर ५० हजार रुपये प्रतिटनावर पोचले होते. सामान्यतः २३ ते १५ हजार रुपये प्रतिटन विकल्या जाणाऱ्या मृग बहरातील संत्र्याचे दरही चढे राहतील, असा अंदाज आहे. नागपूर परिसरात मासोद, कामठी, धोतीवाडा भागात बागा बहरण्याचे प्रमाण कमी असल्याची माहिती डॉ. हरिभजन धारपुरे यांनी दिली. 

विदर्भात दीड लाख हेक्‍टर क्षेत्र विदर्भात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा आहे. त्यातील ९० हजार हेक्‍टरवरील संत्रा झाडे उत्पादनक्षम असली तरी या वर्षी वातावरणाच्या प्रभावामुळे यातील २५ टक्‍के बागायतदारांनाच मृग बहर घेता आला, असे जाणकार सांगतात. गेल्या दोन वर्षांपासून संत्रा बागायतदारांवरील संकटाची ही मालिका कायम आहे. प्रतिक्रिया अमरावतीच्या मोर्शी तालुक्‍यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाळा, जामगाव, हिवरखेड या भागात पावसाने वेळीच हजेरी लावल्याने बागा बहरण्याचे प्रमाण अधिक  आहे. - मोहन कानफाडे गुरुजी, संत्रा बागायतदार, वातावरणातील बदलाच्या परिणामी काही भागात संत्रा बागा वाळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांनी या भागातील बागांना भेटी देत अपेक्षित मार्गदर्शन करावे, अशा आशयाचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे.  - सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com