कडवंची : हमखास मजुरी देणारं गाव

हमखास मजुरी देणारं गाव
हमखास मजुरी देणारं गाव

द्राक्षबागांमुळे कडवंची गावात बारमाही रोजगार तयार झाला. जसं जसे द्राक्ष, भाजीपाला लागवडीचे क्षेत्र वाढू लागले, तसं तशी मजूर टंचाईदेखील जाणवू लागली. गेल्या पाच वर्षांत गावात मजूर मिळेना, अशी परिस्थिती तयार झाली. त्यामुळे परजिल्ह्यातील, तसेच मध्य प्रदेशातील मजूर द्राक्ष छाटणी, फवारणी, काढणी, पॅकिंग आणि वाहतुकीच्या हंगामात बागेत वस्ती करून राहतात. मजूर वर्ग द्राक्षबागेच्या व्यवस्थापनात प्रशिक्षित झाले असल्याने बागायतदारांची चिंता काही प्रमाणात मिटली.  कमी लागवड क्षेत्र असणारे युवा शेतकरी, तसेच शेतकरी महिलांनीही द्राक्षबागेतील कामे करण्यासाठी टोळ्या बनविल्या. रोजगाराचे नवे मॉडेल तयार झाले आहे. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ पंडित वासरे म्हणाले, की पाणलोट, जलसंधारणाच्या कामामुळे गावशिवारात पीक बदल झाला. शेतकरी द्राक्ष, भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळाले. नुसत्या द्राक्ष लागवडीचा आढावा घ्यायचा झाला, क्षेत्र सुमारे ४८० हेक्टरपर्यंत पोचले आहे. भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र ५७ हेक्टर वरून १०५ हेक्टरवर पोचले. त्यामुळे मजुरांची मागणीदेखील वाढली. आता परगाव, तसेच परराज्यांतील मजुरांच्या टोळ्या हंगामानुसार येतात आणि ठोक रक्कम ठरवून शेतीतील कामे करून देतात. ११९६ पूर्वी दर वर्षी ३२ लाखांची मजुरी देणारे गाव आता पीकबदलातून आठ कोटी रुपयांची मजुरी देते. स्थलांतर होणारे गाव आता रोख मजुरी देणारे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.   बनविली महिलांची टोळी सकाळी दहाची वेळ... बाबासाहेब क्षीरसागर यांच्या बागेच्या बांधावर द्राक्ष वाहतुकीसाठी पीकअप व्हॅन उभी. बागेत क्रेट ठेवलेले, शेजारी वर्तमानपत्राचा गठ्ठा. बागेत स्वतः क्षीरसागर पती-पत्नी आणि बारा महिला द्राक्ष घड तपासून कात्रीने हलक्या हाताने तोडून क्रेटमध्ये व्यवस्थित भरून त्यावर कागदाचे पॅकिंग करून पीकअपमध्ये भरण्यात मग्न... हेच चित्र जवळपास कडवंचीतील द्राक्षबागेत दिसते.  बाबासाहेब क्षीरसागर यांच्या बागेतील द्राक्षांची तोडणी, क्रेटमध्ये भरून ते पीकअप व्हॅनमध्ये भरण्याचा ठेका एका महिला गटाने घेतलेल्या. गटाच्‍या प्रमुख पार्वती विनायक शिंदे. त्यांची कडवंची शिवारात मोठ्या कष्टाने उभी केलेली दीड एकर द्राक्षबाग. कुटुंबाच्या बरोबरीने द्राक्षबागेचे व्यवस्थापन सांभाळत त्यांनी द्राक्ष तोडणी, पॅकिंग आणि गाडीमध्ये क्रेट भरून देण्याचे काम करणारी महिलांची टोळीच तयार केली आहे. ही टोळी दिवसाला सरासरी ३००० रुपयांची कमाई करते. अशा सुमारे तीस टोळ्या गावात द्राक्ष हंगामात तीन महिने कार्यरत असतात.  साधारणपणे फेब्रुवारी ते एप्रिल या द्राक्ष तोडणीच्या हंगामात महिलांची टोळी गावातील द्राक्षबागेत घड तोडणी ते वाहतुकीपर्यंत सक्रिय असते. या रोजगाराबाबत पार्वती शिंदे म्हणाल्या, की माझी स्वतःची दीड एकर द्राक्षबाग आहे. माझ्या बागेतील कामे संपली, की आर्थिक मिळकतीसाठी गावातच द्राक्ष तोडणी, क्रेट भरणे आणि वाहतुकीच्या गाडीमध्ये भरण्याच्या कामाची लगबग असते. गावशिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड असल्याने मजूर टंचाई आहे. त्यामुळे मी गावातील दहा महिलांची टोळी तयार केली. यातील काही जणींकडे द्राक्षबाग आहे, त्यामुळे सर्वांना द्राक्ष तोडणीपासून ते पॅकिंगपर्यंतचे तांत्रिक ज्ञान आहे. आम्ही द्राक्ष तोडणीच्या हंगामात बागायतदांच्या बरोबरीने बोलून नियोजन करतो. द्राक्ष घड तोडणीकरून क्रेटमध्ये योग्य पद्धतीने भरणे, क्रेटवर कागदाचे पॅकिंग करून ते वाहतुकीच्या गाडीत भरण्यासाठी आम्हाला प्रतिक्रेट (दहा किलो) १२ रुपये मजुरी मिळते.  एका पीकअप गाडीत सरासरी २०० क्रेट बसतात. दररोज आमची टोळी सरासरी ४०० ते ५०० क्रेट द्राक्ष काढणी, पॅकिंग करून गाडी भरून देते. दिवसाला दहा जणींना मिळून ३००० ते ४००० रुपयांपर्यंत रोजगार मिळतो. सरासरी तीन महिन्यांच्या काळात एक महिला वीस ते पंचवीस हजारांची मजुरी मिळविते.   शेतीमध्ये गुंतवणूक  मजूर टोळीत कार्यरत असणाऱ्या महिला मिळालेली रक्कम ही घरखर्चाच्या बरोबरीने स्वतःची शेती, पीक व्यवस्थापन, शेळी, म्हैस खरेदी, घराचे बांधकाम यासाठी वापरतात. द्राक्ष शेतीतील व्यवस्थापनाची शिस्त आर्थिक नियोजनाच्या कामी आली. त्यामुळे आर्थिक बचतीबरोबरीने या महिला शेती विकासाच्या नियोजनातदेखील पुढे आल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com