व्हॉट्‌सऍप ठरवतंय निवडणुकीच्या प्रचाराची दिशा..!

व्हॉट्‌सऍप ठरवतंय निवडणुकीच्या प्रचाराची दिशा..!
व्हॉट्‌सऍप ठरवतंय निवडणुकीच्या प्रचाराची दिशा..!

बंगळूर : प्रचारसभांमधला धुराळा आणि वाकयुद्धं विसरून जा..! कारण, भारतातल्या निवडणुका आता व्हॉट्‌सऍपवरून लढविल्या जात आहेत आणि त्याचा प्रभाव प्रत्यक्ष प्रचारसभांपेक्षा कितीतरी जास्त आहे, असे निरीक्षण परदेशी माध्यमांनी नोंदविले आहे.

कर्नाटकच्या निवडणुकीतील प्रचाराचा 'ट्रेंड' लक्षात घेत 'द वॉशिंग्टन पोस्ट' आणि अन्य काही परदेशी माध्यमांनी यासंदर्भात मत मांडले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची 'सेमी फायनल' म्हणून पाहिल्या जात असलेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर झाला. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी व्हॉट्‌सऍपवर जास्त भर दिला होता. 

या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 20 हजारांहून अधिक व्हॉट्‌सऍप ग्रुप्स आहेत. याद्वारे अवघ्या काही मिनिटांमध्ये पक्षाची भूमिका किंवा संदेश पंधरा लाखांहून अधिक युझर्सपर्यंत पोचविणे शक्‍य झाले होते. अर्थात, यात प्रचाराची सोय असली, तरीही चुकीची माहिती आणि भावना भडकाविणाऱ्या पोस्टमुळे तणावाची परिस्थितीही काही ठिकाणी निर्माण झाली होती. या अर्थाने कर्नाटकची निवडणूक ही 'व्हॉट्‌सऍप फर्स्ट' होती, असेही परदेशी माध्यमांचे मत आहे. 

भारतामध्ये व्हॉट्‌सऍपचा युझर बेस मोठा आहे. भारतात व्हॉट्‌सऍपचे जवळपास 20 कोटी युझर्स आहेत. 'सोशल मीडियामुळे प्रत्येक घरात पोचणे आणि पक्षाची भूमिका पोचविणे आता सहज शक्‍य झाले आहे. तसेच, या माध्यमातून आम्हाला क्षणार्धात 'ग्राऊंड रिऍलिटी' समजते', असे मत भाजपचे मंगळूर येथील प्रवक्ते विकास पुत्तुर यांनी सांगितले. 

'भारतातील राजकीय पक्ष त्यांच्या प्रचारासाठी व्हॉट्‌सऍपचा वापर करत आहेत. यासाठी त्यांनी आमच्याकडून कुठलीही मदत मागितलेली नाही', असे व्हॉट्‌सऍपच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. 'कर्नाटकची निवडणूक हा आमच्यासाठीही एक धडा आहे. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर नियंत्रण कसे आणायचे, यावर काम सुरू आहे', असे व्हॉट्‌सऍपद्वारे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com