कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवले

कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवले
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवले

सोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यात सगळीकडेच शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशीही बुधवारी (ता. १८) जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच लाख लिटर संकलन बंदच होते. अनेक ठिकाणी दूध ओतणे, टॅंकर फोडणे, अडवणे अशा पद्धतीची आंदोलने सुरूच राहिली. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली; पण नंतर समज देऊन सोडून देण्यात आले. पण संघटनांनी हे आंदोलन आणखीनच तीव्र करण्याचे जाहीर करत गुरुवारी (ता. १९) जिल्ह्यात ठिकठिकाणी जनावरांसह रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात कर्नाटकच्या सीमा भागातून येणारे दूध मंगळवारी सायंकाळी वडकबाळ गावानजीक कार्यकर्त्यांनी अडवले. त्यानंतर हे दूध गावातील गरीब लोकांना वाटण्यात आले. त्याशिवाय बेगमपूर (ता. मोहोळ) येथे नेचर दूध डेअरीच्या प्लान्टमध्ये शेतकऱ्यांनी थेट घुसून डेअरीमधील टाक्‍यांमध्ये असलेले जवळपास २० हजार लिटर दूध सांडून टाकले.

पंढरपुरातही दूधपुरवठा करण्यासाठी आणण्यात येत असलेला एक टॅंकर कार्यकर्त्यांनी शहरात पकडून फोडला. त्यातील दूध पंढरपुरातील वारकऱ्यांना वाटण्यात आले. त्याशिवाय तालुक्‍यातील तुंगत येथे मध्यरात्री शिवामृत दूध संघाचे सोलापूरकडे निघालेले पाच टॅंकर अडवले. यामध्ये तीन टॅंकरमध्ये दूध आणि दोन गाड्यांमध्ये दूध पिशव्या आंदोलकांनी माघारी पाठविले. जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा संघटक विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष तानाजी बागल, आदींनी आंदोलनात भाग घेतला.

माळशिरस आणि माढा तालुक्‍यातही काही भागांत कार्यकर्त्यांनी दूध टॅंकर फोडले. दरम्यान, आंदोलनाची ही धार वाढतच असल्याने सोलापूर जिल्हा दूध संघासह खासगी दूध व्यवसायिकांनी तिसऱ्या दिवशीही संकलन बंद ठेवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com