काटेपूर्णा अभयारण्यात सव्वाशे प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद

अकोला ः निरीक्षणादरम्यान अाढळलेल्या पक्ष्यांची काही चित्रे
अकोला ः निरीक्षणादरम्यान अाढळलेल्या पक्ष्यांची काही चित्रे

अकोला : जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात केलेल्या पक्षिगणनेत पक्ष्यांच्या १२५ पेक्षा अधिक प्रजाती अाढळून अाल्या असून, त्यात दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश अाहे. नुकतीच ही एकदिवसीय पक्षी निरीक्षण व गणना करण्यात अाली. सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रांत अभयारण्याच्या चार भागांमध्ये पक्षी मोजण्यात आले.

वन्यजीव विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात अकोल्याचे पक्षी अभ्यासक व छायाचित्रकार रवी धोंगळे, देवेंद्र तेलकर, विष्णू लोखंडे, डॉ. संदीप साखरे तसेच वाशीमचे मिलिंद सावेदकर, पुरुषोत्तम इंगळे, नीलेश सरनाईक, अंगुल खांडेकर, चंद्रकांत पाटील यांनी सहभाग नोंदविला.   निरीक्षणादरम्यान या अभयारण्यात १२५ प्रकारच्या पक्षी प्रजाती नोंदवण्यात आल्या.

ज्यामध्ये अभयारण्याचा भाग असलेल्या काटेपूर्णा जलाशयात ऑस्प्रे, ब्लॅक स्टॉर्क व युरेशीयन थिंकनी या महत्त्वपूर्ण नोंदी ठरल्या; तर जंगल प्रजाती पक्ष्यांमध्ये लेसर यलोनॅप वूडपीकर या दुर्मिळ सुतारपक्ष्याची नोंद घेण्यात आली. तसेच सल्फर वेलीड बार्बलर, ट्री पीपीट, ब्लॅक नॅप मोनार्च, ऑरेंज हेडेड ‍थ्रश, अल्ट्रा मरीन फ्लायकॅचर, एशियन पॅरॉडाईज फ्लायकॅचर, विशेष नोंदी घेण्यात पक्षिमित्रांना यश आले.

अभयारण्यात रात्रीच्या मुक्कामाला येणारे हजारो पोपट व त्यात अधिक प्रमाणात असलेले अलॅक्झेंड्रीन पॅरॅकिट (IUCN च्या यादीत दुर्मिळ स्थितीत आहेत) असणे ही बाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. तसेच पश्चिम घाटातील मुळचा असणारा पिवळ्या मानेचा सुतार व इतर काही दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी काटेपूर्णा अभयारण्यात होणे ही बाब उत्साहवर्धक ठरली. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा जलाशयाच्या सभोवती वसलेले काटेपूर्णा अभयारण्य हे पर्यटनाच्या दृष्टीने निसर्गरम्य स्थान आहे. अभयारण्यातील वने दक्षिण उष्ण कटिबंधीय  शुष्क पर्णगळी वने या प्रकारात मोडतात.

अभयारण्यातील पर्वतरांगा अजंठाच्या पवर्तरांगा आहेत. येथे साग, धावडा, मोईन, बिजा, मोह, आवळा, बेहाडा, बेल, सालई इत्यादी मोठे वृक्ष आढळतात. तसेच हिवर, आपटा, पळस, लोखंडी, अमलतास इत्यादी छोटी झाडे आढळतात. निरगुंडी, बोराटी, आमटी रायमोनीया, भराटी इत्यादी झुडपे तसेच तिखाडी मारवेल, कुसळी, पवण्या, कुंदा इत्यादी गवत प्रजाती आणि पिवळवेल, धामणवेल, गळवेल इत्यादी वेली अभयारण्यात आढळतात. औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com