सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक टाळा

सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक टाळा
सतर्क राहा ! बियाणे खरेदीतील फसवणूक टाळा

पुणे : खरिपाची लगबग प्रत्येक शिवारापासून ते गावागावांतील कृषी सेवा केंद्रांपर्यंत दिसू लागली आहे. लहरी पाऊसमान, पीक पद्धती आणि त्यादृष्टीने निविष्ठा खरेदी यांचे गणित बळिराजा जुळवू लागला आहे. अशा धामधुमीत बियाणे खरेदीवेळी अत्यंत जागरूक राहून आपली फसवणूक होणार नाही याची सतर्कता बाळगण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. बियाणे लेबल, टॅग, पक्के बिल, त्यावरील सविस्तर विवरण या बाबींचा अभ्यासच नुकसान टाळण्यास किंवा त्याची भरपाई मिळवून देण्यास महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.   दरवर्षीप्रमाणे पावसाची चाहूल घेत शेतकरी यंदाच्या खरिपाच्या नियोजनात व्यस्त झाला आहे. यंदाची पीक पद्धती निश्चित करताना वाणाच्या निवडीबरोबर बियाणे निवड व खरेदीदेखील तितक्याच चांगल्या प्रकारे झाली, तर खरिपाची पुढील वाटचाल यशस्वी करणे त्याला सुलभ होणार आहे. बाजारात असंख्य कंपन्या विविध वाण, खते तसेच अन्य निविष्ठा उपलब्ध करीत शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा धामधुमीत अत्यंत जागरूक व अभ्यासू राहून आपली कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची सतर्कता शेतकऱ्यांनी बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हीच सतर्कता खरीप यशस्वी करण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.   निविष्ठा खरेदी करताना काय घ्याल सावधगिरी?

  •  बियाणे पॅकिंगवरील ‘लेबल क्लेम’ सर्वांत महत्त्वाचे. 
  •  बियाणे कोणत्या हंगामासाठी तसेच कोणत्या विभागासाठी त्याची शिफारस आहे याची खात्री करावी. 
  •  सत्यप्रत (ट्रूथफूल) बियाण्यांच्या गुणवत्तेची हमी व जबाबदारी संबंधित कंपनीकडे असते. 
  •  बियाणे पॅकिंगवर टॅग व त्याचा रंग तपासून घ्यावा.
  •  टॅगवरील लॉट क्रमांक पाहावा.
  • टॅगवरील खालील माहिती महत्त्वाची 
  •  टॅग क्रमांक
  •  प्लॉट नंबर
  •  आनुवंशिक, भौतिक शुद्धता, बीजोत्पादन, बीज प्रमाणीकरण अधिकारी यांची सही, शिक्का
  •  बियाण्यांची उगवणशक्ती
  •  ती तपासण्याची तारीख
  •  बियाणे वापराची अंतिम तारीख 
  •  परवानाधारक कृषी सेवा केंद्रांमधूनच खरेदी करावी. त्याची पक्की खरेदी पावती घ्यावी. 
  •  बिलावरील सर्व रकाने नोंदविल्याची खात्री करावी. यात संबंधित शेतकऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता, बियाणे खरेदी तारीख, बियाणे उत्पादक कंपनीचे नाव, बियाण्याचा प्रकार, वाण, लॉट नंबर, उत्पादकाचे नाव, वजन, विक्री किंमत, छापील बिल क्रमांक आदी तपशील पाहावा. 
  •  बिलावर संबंधित कृषी सेवा केंद्रचालक व शेतकऱ्याची सही असावी. 
  •  पॅकिंगवरील छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम आकारली गेल्यास जिल्हा नियंत्रक, वैद्यमापनशास्त्र (वजनमापे) यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी.  
  •  मुदतबाह्य, पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये.
  •  कापडी पिशवी तीनही बाजूंनी शिवलेली असावी. त्याच्या वरील बाजूला लेबल व बीजप्रमाणीकरण यंत्रणेचा वा कंपनीचा टॅग असतो. 
  •  बियाण्याची पिशवी सीलबंद अाहे याची खात्री करावी. लेबलवरील छपाई स्पष्ट असून बीज प्रमाणीकरणाची मानके मापदंडानुसार असल्याची खात्री करावी. 
  •  बियाणे वैध मुदतीचे असल्याची खात्री करावी.  
  •  टॅगवरील बियाण्याचा प्रकार पाहावा. प्रमाणित बियाण्याचा टॅग निळा, तर सत्यप्रत बियाण्याचा टॅग फिक्कट हिरव्या रंगाचा असतो.
  •  सदोष बियाणे कसे अोळखाल?   
  •  पेरल्यानंतर उगवणक्षमता पोषक परिस्थितीत खूपच कमी आढळल्यास 
  •  त्यातील काडीकचरा, अन्य पिकाचे बियाणे, तणांचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त अाढळल्यास  
  •  बियाण्याचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा न आढळल्यास, कणसात 
  • दाणे न भरल्यास, बोंडे कमी, वाढ एकसमान 
  • नसल्यास.
  • तक्रार दाखल करताना काय काळजी घ्याल?

  •  बियाणे खरेदीची पावती व पिशवी व्यवस्थित जपून ठेवावी. कुटुंबातील  मुख्य व्यक्तीच्या नावे सर्व सदस्यांच्या वतीने एकच बिल तयार केले असल्यास तक्रारीवेळी अडचणीचे ठरू शकते. 
  •  तक्रार करण्यापूर्वी पेरणी तारीख, पेरणी पद्धत, पेरलेले एकूण क्षेत्र, पेरणीसाठी वापरलेले एकूण बियाणे, वापरलेली कीडनाशके, खते आदी सूक्ष्म तपशीलाची नोंद ठेवावी. 
  •  बियाणे सदोष असल्याचा चौकशी समितीकडून अहवाल आल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवावी. यात सातबाराचा उतारा, पंचनामा, छायाचित्रे, बियाणे काढणीपासून ते काढणीपर्यंत व्यवस्थापन तपशील, पीक संरक्षण, खतांचा वापर आदी खर्चाचा तपशील जोडावा. यासाठी शेती ज्यांच्या नावे आहे त्यांच्याच नावाची बियाणे खरेदी पावती असणे आवश्‍यक आहे. पक्के बिल व त्यातील एखाद्या बाबीचे विवरण अपूर्ण अाढळल्यास पीक नुकसान होऊनही ते सिद्ध करण्यात अडचणी येऊ शकतात. 
  •  बियाण्यांची पिशवी नेहमी खालील बाजूने फोडावी. जेणे करून ज्या बाजूने टॅग असेल तो शाबूत राहून 
  •   त्याचा पुरावा गृहीत धरला जाऊ शकतो. पॅकिंगवरील मजकूर सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.
  •  बियाण्याचा थोडा नमुना पॅकिंगमध्ये शिल्लक ठेवावा. जेणे करून अधिकाऱ्यांना तो पाहणे शक्य होते. 
  •  तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल करता येते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com