खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ सुरू

खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ सुरू
खानदेशात चाराटंचाईने जनावरांची होरपळ सुरू

जळगाव : जिल्ह्यात रोज लागणाऱ्या चाऱ्यासंबंधी आतापासूनच टंचाई निर्माण होत आहे. रोज चार हजार ४०० मेट्रिक टनांपर्यंतचा चारा आवश्‍यक असून, टंचाई आहे. महागडा चारा विकत घेणे लहान पशुधनपालक, दुग्ध उत्पादकांना शक्‍य नाही. चारानिर्मितीसाठी मोफत बियाणे, खतेवाटप करण्यात येत आहे, पण दुष्काळी भागात पाणीच नाही तर चारा उगवायचा कुठे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.   जिल्ह्यात लहान पशुधन १ लाख ३२ हजार ४९० आहे. त्यांना प्रतिदिन ३९७ मेट्रिक टन चारा लागणार आहे. मोठे पशुधन ६ लाख ६५ हजार ६०४ आहे. त्यांना ३ हजार ९९३ मेट्रिक टन चारा लागेल. असा एकूण ४ हजार ३९१ मेट्रिक टन चारा शेतकरी, पशुपालकांना दर दिवशी लागेल. एवढा चारा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाला दमछाक करावी लागत आहे.  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ४ हजार ५५६.३ हेक्‍टर क्षेत्रावर चारानिर्मिती करण्याचे नियोजन आहे. तर ८५७.१२ हेक्‍टरवर गाळपेर क्षेत्रात चारा निर्मिती होणार आहे. पशुधन पालक, शेतकऱ्यांना चारा उपलब्ध व्हावा. गावोगावी चाराटंचाईवर उपाय योजले जावेत यासाठी चारा उत्पादनाची कार्यवाही प्रशासन करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शासनाच्या आदेशान्वये अर्ज मागविण्यात आले होते. परंतु या योजनेसंबंधी आतापर्यंत केवळ १४० शेतकऱ्यांनी अर्ज पशुसंवर्धन विभागाकडे सादर केले आहेत. परंतु चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, पाचोरा व भडगावचा पश्‍चिम भाग, बोदवड, जामनेरात पाणीटंचाई वाढली आहे. शेतकऱ्यांकडे पाणीच नाही. मग या योजनेत सहभाग घेऊन काय फायदा, चारा उगविणार कसा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. चारा दावणीला उपलब्ध करा. जेथे बागायती आहे, त्या भागात ही योजना सक्तीने राबवून चारा दुष्काळी तालुक्‍यांमध्ये आणा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.  कृषी विभागालाही शासनाकडून आलेले मोफत बियाणे शेतकऱ्यांना बियाणे वाटण्यास सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना चारा लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय झालेला होता. मात्र अद्यापही अशा जागांचा शोध घेण्यात आला नाही. योजनेंतर्गत वैरण पीक घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यासाठी यासाठी ५५ लाखांची खर्चाची तरतूद आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांची १० गुंठे जमीन आहे, सिंचनाची सुविधा आहे, अशांना चारा पिके घेण्यासाठी शासनातर्फे मोफत बियाणे, खतांचा पुरवठा केला जाणार आहे. कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील १२ हजार ४१३ शेतकऱ्यांना २५ हजार ८०० किलो चारा बियाणांचे वाटप करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com