जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार दुहेरी लढत 

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व जळगावातील लोकसभा निवडणुकीच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, या तिन्ही मतदारसंघांमध्ये दुहेरी लढत होईल. शिवसेना-भाजपची युती असली तरी जळगाव, रावेर व धुळ्यात युतीधर्म पाळला जाईल काय, असा मुद्दा चर्चेत आहे. 

शिवसेना-भाजपमधील वाद मागील पाच वर्षांत विकोपाला गेले. भाजपचे नेते एकनाथ खडसे व सेनेचे उपनेते तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगत राहिला. जिल्हा परिषदेत मागील तीन पंचवार्षिक भाजपने शिवसेनेला सोबत घेतले, परंतु या पंचवार्षिकमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. एका सदस्याचा पाठिंबा भाजपला हवा होता, त्यासाठी भाजपने काँग्रेसची मदत घेतली. शिवाय काँग्रेसच्या सदस्याला जिल्हा परिषदेत सभापतिपदही दिले. यामुळे भाजपविषयी ग्रामीण भागात नाराजी वाढली.

काही दिवसांपूर्वी सेनेच्या जि. प. सदस्यांनी भाजपसाठी मते मागायला आम्ही कसे जाऊ, जिल्हा परिषदेत एकमेकांना विरोध व मते मागण्यासाठी एकत्र फिरता, जनता आम्हाला जाब विचारेल, असे जाहीरपणे सांगून भाजपला मदत न करण्याचे संकेत दिले. शिवसेना नेते सुरेश जैन हे तूर्ततरी राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत. पालिकेत सत्ता गमावल्याने जैन गटाला धक्का देत भाजपने सत्ता मिळविली. जळगाव शहर जळगाव लोकसभा मतदारसंघात निर्णायक आहे. आता जैन गटाची भूमिका काय, ते भाजपला मदत करतील का, हा प्रश्न असून मने दुभंगल्याचे कारण राजकीय जाणकार सांगत आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना उमेदवारी मिळाली आहे. देवकर हे मागील विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे प्रतिस्पर्धी होते. देवकर लोकसभेत पोचले तर पुढे गुलाबराव पाटील यांच्यासमोर विधानसभा निवडणुकीत ताकदवान उमेदवार नसणार, यामुळे गुलाबराव पाटील यांचा पुढचा राजकीय मार्ग सुकर करण्यासाठी जळगावमधील सेनेचा एक गट आपली ताकद राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकर यांच्या पाठीशी उभी करण्याची तयारी करीत असल्याचे चर्चिले जात आहे.

रावेरातही शिवसेना व भाजपमध्ये एकी नाही. शिवसेनेचे रावेर भागाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व खडसे यांच्यात राजकीय वैर आहे. चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत लढत दिली होती. आता लोकसभेत खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांना सेनेची मदत मिळेल, असे कुणीही दाव्याने सांगू शकत नाही.

धुळ्यातही सेना व भाजपमध्ये सौख्य नाही. शिवसेना नेते शरद पाटील व धुळे भाजपमधील एका गटात अंतर्गत कलह आहेत. नंदुरबारात सेनेने भाजपला मदत करण्यासंबंधी आश्‍वासन दिले आहे, परंतु तेथेही सेना एकदिलाने भाजपसोबत राहील का, असा प्रश्‍न आहे. 

अशा आहेत लढती भाजपने खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव व रावेर या चार मतदारसंघांमध्ये जळगावात स्मिता वाघ, रावेरात रक्षा खडसे व नंदुरबारात डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. तीन महिला उमेदवार प्रथमच भाजपने रिंगणात उतरविल्या आहेत. आघाडीमध्ये रावेरची जागा काँग्रेसला सुटेल, असे दावे केले जात आहेत, परंतु उमेदवार जाहीर झालेला नाही. नंदुरबारमध्ये काँग्रेसने आमदार के. सी. पाडवी, धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील, तर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com