मालेगाव परिसरातील खरीप संकटात

मालेगाव परिसरातील खरीप संकटात
मालेगाव परिसरातील खरीप संकटात
मालेगाव, जि. नाशिक  : गेल्या महिनाभरात शहर व तालुक्यात पावसाचा थेंबही पडलेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पेरण्या तर केल्या; पण पिके जगणार कशी? अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. तालुक्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी बाजरी, ज्वारी, मका व कपाशीला पाण्याअभावी फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. जूनच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतीकामांना गती मिळाल्याने परिसरातील ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलैअखेर २८ हजार ५४३ हेक्टरवर सर्वाधिक बाजरी पिकाची लागवड झाली आहे. त्या खालोखाल मका व कापूस लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाच्या मंडळनिहाय आकडेवारी पाहिल्यास दाभाडी, निमगाव, सौंदाणे, सायने पट्ट्यातील परिस्थिती फारच बिकट आहे. अनेक गावांत पेरण्याच झालेल्या नाहीत. पेरण्या झालेल्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. या भागात जेमतेम १०० मिमीदेखील पाऊस झालेला नाही. तर वडनेर, झोडगे, करंजगव्हाण, कळवाडी मंडळ क्षेत्रात जूनमध्ये झालेल्या पावसावरच पिके तग धरून आहेत.
गिरणा धरणात २७ टक्केच पाणी मालेगाव तालुक्यात १ जून ते ३० जुलैदरम्यान केवळ ११९ मिमी इतकाच पाऊस झाला आहे. दमदार पावसाच्या अभावाने नाले, विहिरी, कालवे अद्याप कोरडे आहेत. गिरणा नदी खोऱ्यात झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. धरणात २७ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मंडळनिहाय पाऊस (मिमी)
मालेगाव      १७५
दाभाडी   ८९
वडनेर   १९७
करंजगव्हाण १६९
झोडगे   १६५
कळवाडी    १४५
कौळाणे   १०६
सौंदाणे   ८६
सायने    ३८
मिमीनिमगाव   २८

पिके प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर)

ज्वारी   ८५
बाजरी    २८ हजार ५४३
मका    २७ हजार ९००
कडधान्य  २ हजार ७७१
तेलबिया   २३१
कापूस    १७ हजार ४००
खरीप कांदा २२०
एकूण    ७६ हजार ९३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com