पुणे जिल्ह्यात ७६६ कोटींचे पीककर्ज वाटप

कर्जमाफी
कर्जमाफी

पुणे  ः जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांना खरिपासाठी एप्रिल महिन्यापासून पीककर्जाचे वाटप करण्यात येत आहे. दोन महिन्यांत जिल्हयातील ९९ हजार २८० शेतकऱ्यांना ७६६ कोटी ३० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक कर्जवाटप टोमॅटो उत्पादकांना करण्यात आले आहे. खरीप पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना अडचणी येत असतील, तर त्यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या शाखांशी संपर्क साधण्याचे आवाहन बॅंकेच्या सूत्रांनी केले आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना अर्थिक अडचणी भासू नये म्हणून बॅंकेने चालू वर्षी १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे पीक कर्ज बॅंकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यत शून्य टक्के व्याजदराने ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, फळबाग, केळी, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग अशा विविध पीकांसाठी पीककर्ज दिले जाते.

पुणे जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे पीक घेतात. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड हे तालुके आघाडीवर आहे. अलीकडील काळात अनेक शेतकरी मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा अवलंब करून टोमॅटो पीक घेऊ लागले आहेत. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी बॅंकेकडून पीककर्ज घेण्यास प्राधान्य देत आहेत. दोन महिन्यांत तब्बल ५५ हजार २९ हजार शेतकऱ्यांनी ४८ हजार ८१ हेक्‍टरसाठी ३४६ कोटी २ लाख ४७ हजार रूपयांचे पीक कर्ज घेतले आहे.

बॅंकेचे पूर्वीचे जवळपास सव्वा लाख शेतकरी सभासद आहेत. यंदा बारामती व भोर तालुक्‍यात पुन्हा नव्याने ६२ शेतकरी सभासद झाले आहेत. या सभासद शेतकऱ्यांना सुमारे २३ लाख ८ हजार रूपयाचे पीक कर्ज वाटप केले आहे. नव्याने पीककर्ज घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना बॅंकेने सभासद होण्याचे आवाहन केले असून, त्यांनाही पीक कर्ज दिले जाणार आहे.  

तालुकानिहाय शेतकरी संख्या व कंसात पीक कर्जाचे वाटप (कोटी, रूपये) ः आंबेगाव १२,४४७ (८१. ४६), बारामती ५९७९ (४४.०६), भोर ४७०० (२८.९६), दौंड ६७३९ (७३.३९), हवेली २२८५ (१८.९०), इंदापूर ७२३९ (८३.९४),  जुन्नर २२,१५४ (१५२.१८) खेड १६४९७ (९८.९४), मावळ ३०१९ (१९.६८), मुळशी १३०७ (८.६०), पुरंदर ६०४७ (४३.३०), शिरूर ९७५१ (१०६.९१), वेल्हा १११६ (५.९२). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com