नगर जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर खरीप पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर : जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी आता पेरणीचा आकडा सरासरीच्या जवळपास आला आहे. आतापर्यंत ८४.४० टक्के म्हणजे ३ लाख ५८ हजार२६३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तुरीची सरासरीपेक्षा तिप्पट म्हणजे २६ हजार २७५, मुगाचे दीडपट म्हणजे ३३ हजार ६१२ तर उडीदाची सरासरीच्या दुप्पट म्हणजे २७ हजार २८९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख २४ हजार ४९६ हेक्‍टर आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र बाजरीचे १ लाख ६० हजार १८७ हेक्‍टर असून एक लाख दोन हजार हेक्‍टर कापूस लागवडीचे क्षेत्र आहे. मक्‍याचे ४२ हजार तर मुगाचे १९ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत जवळपास शंभर टक्के पेरण्या, कापूस लागवड उरकली होती. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या, कापूस लागवडीला सुरवातीला वेग आलेला नाही.

मात्र पेरणी, कापूस लागवड करण्याचा कालावधी संपत आल्याने शेतकऱ्यांनी अल्प पावसावरच पेरण्या उरकल्या आहेत. खरिपातील सरासरीच्या तुलनेत भाताचे लागवड झालेले क्षेत्र अजूनही कमीच आहे. खरीप ज्वारीची पेरणी झालेली नाही. बाजरीची पेरणी ५० टक्के असून रागीची पेरणी अल्प आहे. यंदा भुईमुगाची पेरणी सरासरीच्या पुढे गेली आहे. कापसाची लागवडीने मात्र अजून तरी सरासरी क्षेत्र गाठले नाही. उडीद, मूग, तुरीचे क्षेत्र मात्र यंदाही चांगले आहे. यंदा अजून समाधानकारक पाऊस नसला तरी सरासरीपेक्षा जास्ती पेरणी होईल, असे कृषी विभागातून सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com