खरिपाची पेरणी १९४४ हेक्‍टरवर

खरिपाची पेरणी १९४४ हेक्‍टरवर
खरिपाची पेरणी १९४४ हेक्‍टरवर

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात गुरुवारपर्यंतच्या (ता. १४) कृषी अहवालानुसार १९४४ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये जालना जिल्ह्यातील १५०९ हेक्‍टर; तर बीड जिल्ह्यातील ४३५ हेक्‍टरवरील खरीप पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे.

यंदा पावसाचा अंदाज बऱ्यापैकी असला, तरी औरंगाबाद जिल्ह्यावर मात्र पावसाची अजून समाधानकारक कृपादृष्टी झाली नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पेरणीच्या गतीला ब्रेकच लागला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरीची पेरणी झाली नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात ४५ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली. तुरीची यंदा तीनही जिल्ह्यांत १ लाख ४३ हजार ५४९ हेक्‍टरवर लागवड अपेक्षित असली तरी प्रत्यक्षात तूर लागवडीचा श्रीगणेशा होणे बाकी आहे. मुगाची जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात २९ हेक्‍टरवर पेरणी झाली. भोकरदन तालुक्‍यातच ६५ हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी आटोपली आहे.

सिल्लोड तालुक्‍यात ८ हेक्‍टरवर खरीप सुर्यफूलाचीही लागवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा खरिपाचे क्षेत्र ७ लाख ३ हजार ६४० हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामध्ये अजून पेरणीला प्रारंभ झाला नाही. दुसरीकडे जालना जिल्ह्यात यंदाच्या खरिपात प्रस्तावित ५ लाख ७९ हजार ३०९ हेक्‍टर प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १५०९ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. बीड जिल्ह्यात यंदा ७ लाख ९ हजार ३६८ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रत्यक्षात अर्धा जून लोटल्यानंतर बीड जिल्ह्यातील केवळ ४३५ हेक्‍टरवरच खरिपाची पेरणी आटोपली आहे.

१८०५ हेक्‍टरवर कपाशी लागवड औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात यंदा कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख  १४ हजार ६६६ हेक्‍टर प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या तुलनेत आजवर १८०५ हेक्‍टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील सर्वाधिक १३७० हेक्‍टर; तर बीड जिल्ह्यातील ४३५ हेक्‍टरवरील कपाशीचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव या एकमेव तालुक्‍यात कपाशीची ४३५ हेक्‍टरवर लागवड झाली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यात ४७५ हेक्‍टर, जाफराबाद तालुक्‍यात १०५ हेक्‍टर, जालना ८० हेक्‍टर, अंबड ११० हेक्‍टर, परतूर १५० हेक्‍टर, बदनापूर १७० हेक्‍टर, घनसावंगी २२० हेक्‍टर; तर मंठा तालुक्‍यात ६० हेक्‍टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com