दुष्काळी भागात रुजतंय ‘क्विनोआ’ पीक

दुष्काळी भागात रुजतंय ‘क्विनोआ’ पीक
दुष्काळी भागात रुजतंय ‘क्विनोआ’ पीक

नगर : राज्यातील शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अकरा जिल्ह्यांमध्ये ‘क्विनोआ’ हे परदेशी पीक रुजत आहे. यंदा पहिल्यांदाच राज्यभरात चारशे बारा एकर क्षेत्रावर या पिकाची लागवड झाली आहे. राजगिऱ्यासारखे असणाऱ्या या पिकाची काही शेतकऱ्यांनी काढणी केलेली असून, एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. साधारण सरासरी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, या पिकाला बाजारात स्वतंत्र मार्केट नसून, शेतकरी कंपन्यांनी दिल्लीतील एका ट्रस्टशी खरेदी करार केला अाहे.  चीन, जपान, इटली, ऑस्ट्रेलियात येणाऱ्या क्विनोआ पिकाची यंदा भारतातही लागवड होत आहे. यंदा नगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, सोलापूर, बुलडाणा, यवतमाळ, जालना, परभणी, धुळे, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये २४ शेतकरी कंपन्यांच्या पुढाकारातून चारशे बारा एकर क्षेत्रावर क्विनोआची लागवड झाली आहे. या उपक्रमासाठी नगर जिल्ह्यामधील वांबोरी (ता. राहुरी) येथील गर्भगिरी शेतकरी कंपनी समन्वयक म्हणून काम करत आहे. 

इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चात येणाऱ्या या पिकाला कमी पाणी लागते. एकरी सात ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळाले असल्याचे चिंचोडी (ता. नगर) येथील उद्धवराव जगताप या शेतकऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्यात क्विनोआची साठ एकरांवर पेरणी झाली आहे.  शंभर रुपये किलोनुसार करार शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरवतीदेवी मेमोरियल ट्रस्ट या दिल्लीतील संस्थेशी प्रतिकिलो शंभर रुपये या दराने विक्री करार केला आहे. क्विनोआपासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. क्विनोआपासून ब्रेड, बेबी फूड, सूप, मिश्रधान्य, बिस्किटे, केक आदी उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना देशात व देशाबाहेरही मागणी आहे. करार केलेली संस्था थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी करते. असे आहे क्विनोआ पीक राजगिऱ्यासारखे दिसणारे आणि त्याच पद्धतीने उत्पादन घेता येणारे क्विनोआ हे पीक प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील आहे. रब्बी हंगामातील हे पीक साधारणपणे नव्वद दिवसांत तयार होते. काळी, चुनखडीयुक्त जमीन, मुरमाड जमिनीवर या पिकाची लागवड करता येते. लागवड केलेल्या जमिनीतून निचरा होणे गरजेचे असते. लागवडीसाठी एकरी एक किलो बियाणे लागते. इतर पिकांच्या तुलनेत या पिकाला खर्चही कमी येतो, अशी माहिती प्रा. गंगाधर चिंधे यांनी दिली. परभणीत क्विनोआची प्रायोगिक लागवड महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या चिकलठाणा (ता. सेलू) येथील जिवाजी महाराज अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ब्राह्मणगाव, म्हाळसापूर, कुंडी, चिकलठाणा या गावांतील शेतकऱ्यांनी दहा एकरांवर क्विनोआची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे. क्विनोआ खरेदीसाठी दिल्ली येथील खासगी कंपनीशी करार करण्यात आलेला आहे. ‘‘महाराष्ट्रात पहिल्यांदाच क्विनोआ पिकाची लागवड झालेली आहे. आम्ही शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभर चारशे बारा एकरांवर पेरणी केली आहे. हे कमी पाण्याचे पीक असल्यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदेशीरच ठरेल.’’ - प्रा. गंगाधर चिंधे, अध्यक्ष, नगर जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनी संघ, नगर ‘‘किनोआ उत्पादनाला खर्चही फारसा लागत नाही. देशासह जगभरात त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाला मागणी असल्याने दरही चांगला मिळतो. पुढील वर्षापासून अजून क्षेत्रवाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’ - भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रकल्प संचालक, आत्मा, नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com