‘किसान क्रांती’ची मेपासून संपाची हाक

आमच्या समक्ष शासनाने मान्य केलेल्या मागण्यांविषयी यापुढील लढाईत शासनाला जाब विचारला जाईल. त्यासाठी विविध ठिकाणी बैठका व शेतकऱ्यांचे एकमत करण्यासोबतच शांततेच्या व रचनात्मक मार्गाने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. - शंकर दरेकर, नाशिक
किसान क्रांती जनआंदोलनच्या बैठकीत आपले मत व्यक्‍त करताना शेतकरी
किसान क्रांती जनआंदोलनच्या बैठकीत आपले मत व्यक्‍त करताना शेतकरी

औरंगाबाद : किसान क्रांती जनआंदोलनाच्या औरंगाबादेत सोमवारी (ता. १) झालेल्या बैठकीत येत्या मे महिन्यापासून पुन्हा एकदा राज्यभरातील शेतकरी संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी पुढील चार महिन्यांत राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात जाऊन जागर केला जाणार आहे. २ जूनला सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचे झाले काय? याचा जाब सरकारला विचारण्यासाठीच पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने संपावर जाण्याची तयारी शेतकरीवर्गाकडून केली जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.   औरंगाबादेत झालेल्या बैठकीला जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह विजय काकडे पाटील, संगमनेरचे सतीश कानवडे, नितीन थोरात, महेश गुजरे, किशोर दसपुते, विष्णू बोडखे, उस्मान बेग, शंकर दरेकर (नाशिक), बाळासाहेब जाधव (बीड) आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सर्वच व्यक्‍तींनी शेतकरी संपाच्या मार्गक्रमणाची, घडलेल्या घडामोडींना उजाळा देऊन झालेल्या चुका सुधारून शेतकऱ्यांच्या न्याय हक्‍कासाठी २ जून रोजी सरकारने शेतकऱ्यांच्या मान्य केलेल्या १५ मागण्यांचे झाले काय, यावर आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. २०१८ हे वर्ष संपूर्ण कर्जमुक्‍ती वर्ष म्हणून मान्य करत काम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्‍यात जाऊन जनजागृती करण्यात येईल. शेतकऱ्यांच्याच पोरांची मोट बांधून १ ते २० मे दरम्यान केव्हाही राज्यात संपाची सुरवात करण्याचे ठरविण्यात आले. या संपादरम्यान भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या भाज्या मे महिन्यानंतर बाजारात येणार नाहीत याचे नियोजन करावे, मार्च व एप्रिल हे दोन महिने सुगीचे असतात. त्यामध्ये ज्वारी, हरभरा, गहू काढणी सुरू असते, डाळिंब, द्राक्षांचीही विक्री सुरू असते. त्यामुळे शेतातील कामे संपल्यावर शेतकरी संपाचे हत्यार उगारतील. त्यासाठी चार महिन्यांच्या कालावधीत सर्व छोट्या मोठ्या संघटनांच्या नेत्यांना भेटण्याबरोबरच शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन निर्णायक लढाई लढण्याचे या वेळी बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com