किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध आंदोलनास पाठिंबा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून (ता. १६) दूध आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर करीत असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी (ता.१४) झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. नवले बोलत होते. या वेळी डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, नीलेश तळेकर, सोमनाथ बोऱ्हाडे, राजू देसले, नाना बच्छाव, दर्शन पाटील, उमेश देशमुख, विठ्ठल पवार, संतोष वाडेकर, रोहिदास धुमाळ, गुलाबराव डेरे, कारभारी गवळी,  प्रकाश नवल, डॉ. संदीप कडलग, महेश नवले, अशोक सब्बन,  अमोल वाघमारे, माणिक अवघडे, अनिल देठे, सुभाष निकम, दिगंबर तुरकने, खंडू वाकचौरे, गोविंद आर्दड, सिद्धप्पा कलशेट्टी, विलास बाबर, महादेव गारपवार उपस्थित होते.

डॉ. नवले म्हणाले, की दूध उत्पादकांच्या रास्त मागण्यांसाठी किसान सभा व संघर्ष समिती गेली सहा महिने सातत्याने संघर्ष करीत आहे. नाशिक येथून निघालेल्या लॉंग मार्चमध्येही किसान सभेने दूधदराचा प्रश्न उपस्थित केला होता. ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत लाखगंगा येथून सुरू झालेल्या आंदोलनात संघर्ष समितीनेही या प्रश्नावर सातत्याने आंदोलन केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तीन वेळा शासनादेश काढले. दोन वेळा अर्थसाह्याच्या घोषणाही केल्या. मात्र, या प्रत्येक वेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारने दूध पावडर बनविणाऱ्या कंपन्यांनाच केवळ मदत केली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले.

सरकारने सुरुवातीला पावडर बनविण्यासाठी कंपन्यांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान घोषित केले. एक महिन्यासाठी दिलेल्या या अर्थसाह्याचा दूध दरावर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही. आता दूध पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये व दूध निर्यातीसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर व उपलब्धता पाहता या पॅकेजचाही उपयोग होण्याची शक्यता नाही.

अशा पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यात दूध आंदोलनाची घोषणा केली आहे. किसान सभा व संघर्ष समिती या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी व किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांची दिल्ली येथे यासंदर्भात चर्चा झाली. खासदार शेट्टी यांची डॉ. अजित नवले यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. शेतक-यांच्या न्याय्य मागण्यांसाठी समविचारी शक्तींनी एकत्र काम करण्याची आवश्यकता या वेळी अधोरेखित करण्यात आली.

सरकारने गायीच्या दुधाला किमान २७ रुपये भाव जाहीर केला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र आज प्रतिलिटर दुधाला केवळ १७ रुपये दर मिळतो आहे. लिटरमागे रोज दहा रुपयाचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर जाहीर भाव व प्रत्यक्ष मिळत असलेले भाव यातील फरक भावांतर योजने अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना सरळ अनुदान देऊन भरून द्यावा, अशी मागणी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com