कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी संतप्त

कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी संतप्त
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी संतप्त

पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात घेण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा संशयास्पद होती, असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी सीबीआय चौकशीची मागणी कृषी आयुक्तांकडे केली आहे.  कृषी विभागात बदली, बढत्या, भरती करण्यासाठी सोनेरी टोळी कार्यरत आहे. या टोळीत अधिकारी, कर्मचारी, एजंट तसेच शासनाच्या इतर विभागांतील अधिकारीही सामील असल्याचा संशय आहे. यापूर्वी ७३० जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत याच टोळीने धुडगूस घातला होता. "विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या परीक्षेतील गैरव्यवहाराची तक्रार करीत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र, राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर कृषी आयुक्तालयाचे सहसंचालक सुधीर ननावरे यांना स्वतःच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थी मोघम बोलत नव्हते हे सिद्ध झाले होते. आता दुसरी परीक्षाही संशयास्पद झाली आहे. मात्र, आता सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे परीक्षार्थींचे म्हणणे आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी कुटुंबातील हजारो मुले कृषिसेवक पदासाठी आपले नशीब आजमावित आहे. मात्र, भरतीसाठी सतत संशयास्पद पद्धत वापरली जात असल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडे या प्रकरणी एक नवी तक्रारदेखील दाखल करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलने १३ ते १५ मार्च दरम्यान कृषिसेवकपदासाठी ऑनलाईन परीक्षा घेताना उमेदवारांची बोगस ऑफलाईन बायोमेट्रीक हजेरी घेतली आहे, असा गंभीर आरोप परीक्षार्थी दत्ता वानखेडे यांनी केला आहे. आधार प्राधिकरणाच्या वेबसाईटवरून बायोमेट्रीक हजेरी घेण्याचे टाळण्यात आले आहे. बोगस बायोमेट्रीकमुळे एकापेक्षा जादा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराचे लॉगईन ब्लॉक न होता त्याला जादा परीक्षा देता आल्या. त्यामुळे डमी उमेदवार बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विद्यार्थ्यांनी आयुक्तालयाच्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही कॉम्प्युटरवर बसून लॉगईन केले जात होते. त्यामुळे परीक्षार्थींनी अनेक उमेदवारांचे ग्रुप तयार करून सामूहिक कॉपी करीत पेपर सोडविले आहेत. या उमेदवारांवर परीक्षा पर्यवेक्षकांचे देखील नियंत्रण नव्हते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एकूण ९ शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा घेताना काठिण्यपातळी वेगवेगळी ठेवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. असमान काठिण्यपातळीमुळे काही उमेदवारांना गुण मिळवताना फायदा तर काहींना तोटा झाला आहे. देशात होणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचे तत्त्व या परीक्षेला का लागू करण्यात आले नाही, असा सवाल विद्यार्थ्यांचा आहे. काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग तपासून सामूहिक पद्धतीने पेपर सोडविणाऱ्यांचा शोध घ्यावा व त्यांना परीक्षेतून निलंबित करावे.
  • वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अवघड किंवा सोपा पेपर देण्यात आल्याने सर्व उमेदवारांना गुण देताना नॉर्मलायझेशन व प्रसेंटाईल पद्धतीने गुण द्यावेत.
  • ऑनलाईन परीक्षा घोटाळ्याची सीबीआय चौकशी करून घोटाळेबाजांना सेवेतून काढून टाकावे.
  • आयबीपीएस मार्फत पारदर्शक फेरपरीक्षा घ्यावी.
  • हॉलतिकिटे नसताना दिल्या परीक्षा महापरीक्षा पोर्टलच्या कर्मचा-यांनी राज्यातील कोणत्याही परीक्षार्थीचे साक्षांकित केलेली सहीची प्रत किंवा हॉलतिकिट जमा करून घेतले नाही. काही उमेदवारांनी ओळखपत्र नसतानाही तर काहींनी हॉलतिकिटावर फोटो लावलेला नसतानाही परीक्षा दिल्या आहेत. प्रश्नपत्रिकेतदेखील इंग्रजीचे मराठीचे भाषांतर करताना गुगल ट्रान्सलेटर वापरल्यामुळे परीक्षार्थींना अर्थ लागला नाही. प्रश्नांमध्ये टंकलेखनाच्याही चुका होत्या, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com