‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला; २०० गावांत भीषण पाणीटंचाई

‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला; २०० गावांत भीषण पाणीटंचाई
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला; २०० गावांत भीषण पाणीटंचाई

कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक राज्यातील २०० हून अधिक गावांत गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई भासत आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या समन्वयातून पाणीटंचाई दूर होणे शक्य असताना, याबाबत कार्यवाही होत नसल्याने या गावांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हिप्परगी गावापर्यंतच्या सुमारे २०० हून अधिक गावांत ४५० टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. कृष्णा नदीपात्रात शिरोळ तालुक्यात असलेल्या राजापूर बंधाऱ्यापर्यंत कोयना, चांदोली व काळम्मावाडी धरणाचे पाणी उपलब्ध आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून राजापूर बंधाऱ्याच्या पुढील असलेल्या बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्ह्यांतील हिप्परगी धरणापर्यंतच्या २०० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चिक्कोडी तालुक्यात ११८, रायबाग २१, अथणी ६१, कागवाड २८, तर रबकव्वी बनहट्टीत ३० यांसह अन्य तालुक्यांत कृष्णाकाठावरील गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे सहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. नियोजनाचा फटका गावांना कर्नाटकाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन कर्नाटकाला कोयनेतून पाणी द्या, अशी मागणी केली होती. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकला पाणी देऊ, असा निर्णय झाला होता, त्या बदल्यात अलमट्टीचे पाणी जत, सोलापूरला द्यावे. अशीही मागणी केली होती. पण पुढे कोणतीच अंमलबजावणी न झाल्याने याचा फटका या गावांना बसत आहे. पोलिस बंदोबस्त मागवला २००३ ला कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर (ता. शिरोळ) बंधाऱ्यापुढील असलेल्या हिप्परगी धरणापर्यंतच्या गावांना दोन महिने पाणी नसल्याने कर्नाटकातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जेसीबीच्या साह्याने राजापूर बंधाऱ्याचे बरगे काढून बंधारा पाडण्याचा प्रयत्न केला होता. सध्या ही बिकट परिस्थिती असल्याने खबरदारी म्हणून राजापूर पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्त मागवला आहे. बिकट परिस्थिती कर्नाटक सीमाभागात कृष्णा नदी तीन महिन्यांपासून कोरडी पडल्याने विहिरीबरोबर कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत टँकरचे पाणी पुरत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे कृष्णा नदीपात्रात खड्डे पाडून तांब्याचे साह्याने पिण्यासाठी पाणी गोळा करण्याचे काम रायबाग, कुडची, तेरदाळ परिसरात दिसून येत आहे. जिवापाड जतन केलेली पिकेही वाळली असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com