वऱ्हाडात निंदणी, डवरणीसाठी मजूर मिळेना

माझ्याकडे तीन एकर शेती अाहे. ट्रॅक्टरने पेरणी केली. पैसे देऊनही डवरणीकरिता बैलजोडी वेळेवर मिळत नसल्याने १२०० रुपयांत डवरणी यंत्र अाणले. दिवसभरात एक एकर शेतात डवरणी झाली. -किसन लक्ष्मण नरवाडे, शेतकरी, मोहजा इंगोले
शेतीकामे
शेतीकामे

अकोला ः वऱ्हाडात जून महिन्यातील पहिल्या अाठवड्यात लागवड झालेले पीक अाता महिनाभराचे झाले असून डवरणीला अाले अाहे. अनेक शेतांमध्ये डवरणीची कामे सुरू असून बैलजोडीची संख्या कमी झाल्याने अडचणी येत अाहेत. शिवाय शेती कामांसाठी मजुरांची टंचाईसुद्धा भेडसावू लागली अाहे.

एकाचवेळी निंदण, डवरणी तर काही भागांत पेरणी अशी शेतीतील कामे वेगाने होत अाहेत. महिलांना शेतातील कामाची मजुरी चार तासांसाठी १०० रुपयांपर्यंत तर दिवसभरासाठी २०० रुपये मिळत अाहेत. डवरणीसाठी वेगवेगळ्या भागात क्षेत्रफळानुसार किमान ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत बैलजोडीचा दर अाहे. डवरणीच्या कामासाठी मजुरी देऊनही बैलजोडी मिळत नसल्याचे प्रकार होत अाहेत.

जून महिन्याच्या सुरवातीलाच बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. अधूनमधून पडलेल्या पावसाने ही पीकं तग धरून होती. अाता या अाठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर पिकांना अधिक फायदा झाला. यामुळे सध्या जूनमधील लागवड झालेली पिकं बहरली अाहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना डवरणीचा एक फेर पूर्ण झाला. बैलजोड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने डवरणीसाठी बैल उपलब्ध होणे कठीण झाले अाहे. पेरणीचे काम अनेकांनी ट्रॅक्टरच्या साह्याने करून घेतले. परंतु, डवरणीसाठी अाता पुन्हा ट्रॅक्टरची मशागत सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी बाब राहिलेली नाही. शेतांमध्ये मशागतीच्या कामांसाठी मजुरांना एकाचवेळी मागणी वाढल्याने अडचणी येत अाहेत.

प्रामुख्याने वाशीम, अकोला जिल्ह्यातील काही भागात गेल्या महिन्यात पेरणी झालेल्या पिकात डवरणी, निंदणाची कामे अधिक जोमाने होत अाहेत. मजूर, तसेच बैलजोडी रोजंदारीने मिळत नसल्याने काही शेतकरी मनुष्यचलित यंत्रांचाही वापर करीत अाहेत. मनुष्यचलित डवरणीयंत्र दिवसभरात एक एकरापर्यंत काम करू शकते. शेतकऱ्यांचा अशी छोटी यंत्रे वापरण्याकडे कल गरजेनुसार व काळानुरूप वाढत चालला अाहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com