शीतगृह सुविधांअभावी ४४० अब्जांचा फटका

पायाभूत सुविधांचा अभाव, प्रशिक्षित कामगारांची कमतरता, मागासलेले तंत्रज्ञान आणि सतत खंडित होणारा वीजपुरवठा हे देशात शीतग्रह साखळीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यातील मुख्य अडचणी आहेत. - डी. एस. रावत, मुख्य सचिव, ‘असोचेम’
शीतगृह
शीतगृह

नवी दिल्ली  ः जगात दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर फळे आणि भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, साठवण आणि शीतगृह सुविधांच्या अभावामुळे दरवर्षी भारतात एकूण उत्पादनाच्या ४० ते ५० टक्के दूध, फळे आणि भाजीपाला वाया जाताे किंवा खराब होतात. वाया जाणाऱ्या या उत्पादनांची किंमत ४४० अब्ज डाॅलरवर आहे, अशी माहिती ‘असोचेम-एमआरएसएस’च्या अभ्यास अहवालातून समोर आली आहे.  ‘‘भारतात ६,३०० साठवण सुविधा आहेत. यामध्ये केवळ ३०.१ दशलक्ष टन उत्पादन साठवण्याची क्षमता आहे. देशातील अतिनाशवंत एकूण उत्पादनाच्या फक्त ११ टक्के उत्पादन या सुविधांमध्ये साठविता येते,’’ असे अहवालात ‘असोचेम’चे मुख्य सचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे. ‘‘देशात असलेल्या एकूण साठवण क्षमतेच्या सुविधांपैकी ६० टक्के सुविधा उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि पंजाब या चार राज्यांमध्ये आहेत. दक्षिणेतील राज्यांमध्ये साठवण आणि शीतग्रह सुविधांचा मोठा अभाव आहे. दक्षिणेतील या राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान असते आणि त्यातच सुविधांच्या अभामुळे अतिनाशवंत असलेल्या उत्पादनांचे अधिकचे नुकसान होते. देशात २०१६ मध्ये शीतग्रह साखळीचे १६७.२ अब्ज डॉलरचे मार्केट होते. त्यात वाढ होऊन २०२० पर्यंत २३४.५ अब्ज डॉलरपर्यंत पोचेल. सध्या देशात शीतग्रह साखळीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडत आहेत. मात्र या सुविधा देण्यासाठी लागणारा मोठा खर्च हे या क्षेत्राच्या मागासलेपणाचे एक कारण आहे, असे या अहवालात म्हटले आहे. ‘‘देशातील किरकोळ विक्रेते (किराणा दुकाने) मोठ्या प्रमाणात आहेत. २०१२ मध्ये ५०० अब्ज डॉलर असणारी त्यांची उलाढाल २०२० मध्ये ८४७.९ अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. या क्षेत्रातील व्यापाऱ्यांना अन्नधान्य जमा करणे, साठवण आणि वाहतूक या तीन गोष्टींवर जास्त खर्च करावा लागतो. शीतग्रह साखळी विकसित केल्यास या क्षेत्रातील लोकांना याचा मोठा फायदा होईल,’’ असेही रावत यांनी म्हटले आहे.  सरकारने या बाबतीत काही प्रमाणात पावले उचलत राष्ट्रीय शीतग्रह साखळी विकास केंद्राच्या माध्यमातून काम केले आहे. या क्षेत्रात सरकारने १०० टक्के परकी गुंतवणुकीस मान्यताही दिली आहे.  तंत्रज्ञानाचा वापर सोयीस्कर अतिनाशवंत पदार्थांच्या शीतग्रह साखळीत जीपीएस तंत्रज्ञान आणि सेन्सर यांसारख्ये तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल. याद्वारे तापमान आणि नाशवंत उत्पादने वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती मिळेल. अनेक विकसित देशांमध्ये नाशवंत पदार्थांचे नुकसान या तंत्रज्ञनांच्या वापरामुळे कमी करण्यात यश आले आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शीतग्रह हाताळणीचा खर्चही काही प्रमाणात कमी होतो.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com