लुटता कशाला, फुकटच घ्या ! दूध आंदोलनाला प्रारंभ

लुटता कशाला, फुकटच घ्या ! दूध आंदोलनाला लाखगंगा येथून प्रारंभ
लुटता कशाला, फुकटच घ्या ! दूध आंदोलनाला लाखगंगा येथून प्रारंभ

लाखगंगा, जि. औरंगाबाद : लाखगंगा ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानंतर प्रशासन व शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ठरल्याप्रमाणे दुधाला शासनाने जाहीर केलेला दर मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘फुकट घ्या दूध’ आंदोलन सुरू केलं. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला. लुटता कशाला आणि शोषण करण्यापेक्षा दूध ‘फुकटच घ्या’ या आशयाने सुरू झालेल्या आंदोलनाचा हुंकार लाखगंगा येथून फुटला आहे.  

दरम्यान, अौरंगाबाद जिल्ह्यासह जालना, नगर, परभणी, भंडारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ‘फूकट घ्या दूध’ आंदोलन केले.  लाखगंगा येथे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, युवा शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील, आमदार सुभाष झांबड आदींच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली. सरकारने उत्तम दर्जाच्या दुधाला २७ प्रति लिटर हमी दर निश्‍चित केले असले तरी प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते दूध घालत असलेल्या डेअरी वा संघाकडून मिळत नाहीत. केवळ १६ ते २१ रुपयांवर त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे दूध उत्पादक संकटात सापडला आहे. दूध उत्पादकांची ही लुट सुरू असतांना शेतीपूरकर उद्योग करा म्हणनारं सरकार मूग गिळून बसले. त्यामुळे शासनाचे धोरण आणि लुटीचा निषेध म्हणून लाखगंगा येथील ग्रामसभेत ३ मे पासून दूध फुकट घालण्याचा, वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरही शासन व प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने गुरुवारी (ता.३) सकाळी ७ वाजताच गावकऱ्यांनी दूध गावातील मारुती मंदिराजवळ जमा केलं.

मारुती मंदिरात भजन कीर्तनाने आंदोलनाला सुरवात करण्यात आली. सोबतच दूध उत्पादकाला जाहीर केलेला हमी दर संबंधीतांकडून मिळवून देण्याची बुद्धी शासनाला मिळावी याकरिता देवाला दुधाचा अभिषेक करण्यात आला. दूध उत्पादक संघाच्या संचालकांना निवेदन देऊन मोफत दूध वाटपाला सुरवात करत आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात करण्यात आली. 

या आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्यातील बापतारा डोनगाव, लाखगंगा, पुरणगाव, बाभूळगाव, गंगा सावखेड, गंगा हिंगोनी, भऊर, तर नगर जिल्हातून पुणतांबा, पिंपळवाडी, वारी, संगमनेर, गोंडेगाव आदी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान क्रांती आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कटारे यांनीही दूध दराच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. 

३ मे ते ९ मे अस सात दिवस मोफत दूध वाटप करण्यात येणार आहे. लाखगंगा येथे पहिल्या दिवशी मोफत दूध दिल्या नंतर पुढील सहा दिवस दूध डेअरी आणि शासकीय कार्यालयात मोफत दूध वाटप करण्यात येणार आहे. आंदोलनात लाखगंगाचे सरपंच दिगंबर तुरकने, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, राजेंद्र पाटील कराळे, सखाजी चंदणे, लक्ष्मण मुकींद, जालिंदर तुरकने, बाळासाहेब चव्हाण, प्रभाकर वारसे, अण्णासाहेब थोरात आदींसह दूध उत्पादकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. 

एका टॅंकरचे मशीनमधून तीन टॅंकर करण्याचा प्रकार थांबविला, तर सरकार व संबंधीत म्हणत असलेला शहरातील दुधाचा महापूर थांबेल. सात दिवस शांतीच्या मार्गाने फुकट दूध घालू मात्र त्यानंतरही सरकारला जाग आला नाही, तर आंदोलनाची धार तीव्र केली जाईल. तशी वेळ सरकारने येऊ देऊ नये.  - डॉ. अजित नवले,  किसान सभा, महाराष्ट्र प्रदेश

संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा सर्वात चांगला शेतीपूरक उद्योग म्हणून दूध उत्पादन. मात्र तोही संकटात सापडला आहे. सरकारनं या गंभीर प्रश्नाकडे वेळीच लक्ष द्यावं. दूध दरासाठीच्या या आंदोलनाची धार औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तीव्र केली जाईल. - आमदार सुभाष झांबड,  औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com