लाखगंगा गावात आजपासून ‘फूकट घ्या दूध’ आंदोलन

लाखगंगा गावात आजपासून ‘फूकट घ्या दूध’ आंदोलन
लाखगंगा गावात आजपासून ‘फूकट घ्या दूध’ आंदोलन

औरंगाबाद : शेतीबरोबरच दूध उत्पादनासाठी राबतांना हाडाची काडं करावी लागतात. व्यवस्थेला अन्‌ शासनाला हे कळतं कसं नाही, लाखगंगा गावातील सर्वच दूध उत्पादकांचा काळजाला हात घालणारा हा सवाल, महाराष्ट्रातील दूध उत्पादकांची व्यथा मांडणारा ठरला आहे. २७ रुपये शासकीय दर असताना केवळ १७ ते २१ रुपये हात पडत असल्याने राज्यातील दूध उत्पादक चांगलाच त्रस्त झाला आहे.

उत्पादकांना मिळणारे दुधाचे दर जवळपास अकरा महिन्यांपासून घसरले आहेत. दहा ते बारा रुपयांपर्यंत दरात झालेल्या घसरणीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा १८५ उंबऱ्याच्या गावाचं नुसत अर्थकारणंच कोलमडलं नाही तर जगण्यासाठी नेमकं आता करावं तरी काय? हा विचार मनात घर करून बसला आहे. या उंबऱ्यांपैकी तब्बल १२८ कुटुंबाचा चरितार्थचं दूध व्यवसायावर आहे. एकूण ६२३ गायी या कुटुंबांमध्ये असून गावात पाच दूध संकलन केंद्र आहेत. साडेचार हजार लिटर दूध या पाचही केंद्राच्या माध्यमातून संकलीत केलं जातं. गावासह पंचक्रोशीतील मिळून दहा हजार लीटर दूध रोज खासगी व सहकार क्षेत्रात जाते.

आंदोलनं करूनही कुणाला पाझरं फूटत नाही. सरकारनं जाहीर केलेले दर मिळत नाहीत. त्यामुळे आज (ता. ३) पासून डेअरी व संघांना दूध फुकट घालण्याचा निर्णय लाखगंगा येथील ग्रामसभेने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा या दूध उत्पादकांनी गावातून राज्यातील दूध उत्पादकांच्या मनातील घुसमटीला वाट मोकळी करून देणाऱ्या विषयाला हात घातला गेला आहे.  

नांदूर मध्यमेश्वर कालव्यामुळे गावकुसात बहुतांश बागायती शेती असेल असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं नाही. चाऱ्या, पोटचाऱ्यांची नसलेली व्यवस्था त्यामुळे मोजकीच जमीन भिजते. त्यामुळंच चरितार्थासाठी लाखगंगा गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली. उत्पादकता वाढविण्यासाठी संकरीत गायींची निवड करून दुग्ध व्यवसायातून समृद्‌धीच्या दिशेनं पाउलवाट करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिपाक म्हणून एका कुटुंबाकडे दोनपासून वीसपर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त जनावरांची संख्या पोचली. सुरवातीला उत्पादन खर्च व दराचं गणित जमल्यानं काहींनी त्या व्यवसायाला वृद्धिंगत केलं. पणं आता हीच वृद्धी दर आणि खर्चाचं गणित जुळवितांना बुद्धी गुंग करणारी ठरली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गावातील एकेक दूध उत्पादक काळजावरं दगड ठेवून आपल्या दावणीची दुभती जनावरं विकून टाकत आहेत. सुरवातीला पैसा खेळता ठेवणारा हा उद्योग वर्षभरापासून घसरलेल्या दराचा सामना करणाऱ्या लाखगंगा येथील दूध उत्पादकांना कर्जाच्या खाईत ढकलणारा ठरला आहे.  

दर नसल्यानं हातात येणारं चलनं थांबलयं. कुटुंबात चार लोक त्यांचा चरितार्थ भागवून जनावरांचं संगोपन करतांना जिवाची घालमेल होते आहे. - रामेश्वर कानिफनाथ पडोळ

दूध कितीही दर्जेदार घाला वर्षभरापासून पडलेले दर उठण्याचे नावं घेईना. त्यामुळं चार दुभत्या गायींपैकी एक दोन विकल्या. - बाबासाहेब किसन पडोळ

व्यवसायात खर्चाचं गणित जुळंना म्हणून दावणीच्या तीन गायी अन दोन कालवडी विकल्या. दुधाला किमान तीस रुपये प्रतिलिटर दर दिला तर हा व्यवसाय थोडा परवडलं. - रंजना बाळासाहेब पडोळ  ग्रामसभेतून दुध फूकट घालण्याचा निर्णय झाल्यापासून शासन किंवा प्रशासानाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ आमच्या दुध फूकट घालण्याच्या निर्णयावर ठाम आहोत. ३ ते ९ मे दरम्यान दुध फूकट घातले जाईल त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास पुढे काय करायचे याचा निर्णय घेतल्या जाईल. - दिगंबर तुरकने, सरपंच, लाखगंगा, ता. वैजापूर जि. औरंगाबाद.

वैजापूरला तहसिल कार्यालयात दूध वाटणार लाखगंगा येथे गुरूवारी (ता.३) सकाळी ७ च्या सुमारास दुध उत्पादक संकलन केंद्रात फूकट घालणार आहेत. याचवेळी बापतारा (ता. वैजापूर, जि.औरंगाबाद) येथीलही दुध उत्पादक आपले दुध लाखगंगा येथे घेवून येणार आहेत. तेथील मंदिरात जाहीर दर मिळवून देण्यासाठी शासनाला सद्‌बुद्‌धी मिळावी म्हणून दुग्धाभिषेक करून त्यानंतर दोन्ही गावातील दुध वैजापूर येथील तहसील कार्यालयावर नेवून तेथे ते फूकट वाटले जाणार असल्याची माहिती यासंदर्भातील नियोजनकर्त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com