agriculture news in marathi, late Ex CM Vasantrao Naik, State Rule Uneven practices and development ways | Agrowon

राज्यकारभारातील उणिवा आणि सुधारणेचे मार्ग
'आवाहन' या वसंतराव नाईक यांच्या भाषणसंग्रहातून साभार.
रविवार, 1 जुलै 2018

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक द्रष्टे नेते आणि कुशल प्रशासक म्हणून ओळखले जात. प्रशासनव्यवस्थेचे अंतिम साध्य काय असावे, कार्यपद्धती कशी असावी, याविषयी त्यांना अत्यंत स्पष्टता होती. राज्यकारभाराच्या पद्धतीतल्या काही उणिवा, कार्यक्षमता आणि सुधारणेचे मार्ग या संबंधात त्यांनी १८ सप्टेंबर १९६५ रोजी नागपूर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित केले होते. या भाषणात त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही समर्पक वाटतात व अनेक मुद्दे आजच्या परिस्थितीलाही लागू पडतात. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या भाषणाचा संपादित अंश पुनर्मुद्रित करत आहोत.

आज आपण पाहत आहोत, की देशामध्ये १९६२ मध्ये जेवढा उत्साह होता त्यापेक्षा आज जास्त आहे. त्या वेळी नसणारी शिस्त आजच्या उत्साहाला आहे. त्यामुळेच तुमची- आमची जबाबदारी वाढलेली आहे. उत्पादनक्षेत्रामध्ये आणखी जास्त खर्च करावा लागणार आहे. कारण, ही परिस्थिती काही लवकर मिटणारी नाही. शस्त्रसंधीची चर्चा असली तरी देशाच्या परिस्थितीकडे लक्ष देऊन आपल्या नेत्याला कुठलाही निर्णय घ्यावा लागला तरी तो आपल्याला मंजूर करावा लागेल. परंतु, त्याचप्रमाणे मनाचीही तयारी करावी लागेल, की ही गोष्ट केवळ शस्त्रसंधीने थांबण्यासारखी नाही.

या देशाची शक्ती ही वाढलीच पाहिजे. देशामध्ये शक्तीची पूजा झाली पाहिजे. चीनच्या वेळेला आपल्याला जो अनुभव आला, त्यामुळे आपल्या देशाची परदेशांत जी प्रतिष्ठा होती, तिला धक्का बसलेला आहे. तशा तऱ्हेचा प्रसंग आपल्यावर येऊ नये याची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून या देशाची शक्ती वाढविण्याचे काम जी जनता करते, तिला आपली यंत्रणा किती साथ देते हा एक महत्त्वाचा प्रश्‍न आहे. देशाची शक्ती वाढवावयाची असेल तर दोन मुख्य साधने आहेत. एक कारखाने आणि दुसरी शेती. भूगर्भामध्ये जी संपत्ती आहे, ते एक तिसरे साधन होय. या तिन्ही साधनांचा आपल्याला भरपूर उपयोग करून घ्यावयाचा आहे. 

सर्वांनी ‘संघ’ म्हणून काम करावे 
विकासाच्या योजना आहेत, शेतीची कामे आहेत, पाटबंधाऱ्याची कामे आहेत, विद्युतीकरणाची कामे आहेत. आणखी इतर कामे आहेत. समजा विजेची योजना आहे, त्यांना जमीन मिळवून द्यावयाची आहे. महसूल खात्याचा संबंध आला. त्याला पाणी मिळवून द्यावयाचे आहे. पुन्हा सरकारी बांधकामविभाग किंवा पाटबंधारे खात्याचा संबंध आला. तेव्हा या सर्व खात्यांचे एकच लक्ष्य असले पाहिजे, की आम्ही सारे ‘संघ’ म्हणून काम करू. देशाच्या संरक्षणाकरिता आम्ही लोकांना सांगतो, की तुमचे राजकीय मतभेद तुम्ही विसरून जा, तुमचे वर्गीय मतभेद तुम्ही विसरून जा. आपल्याला निदान आपल्या विभागाचे तरी मतभेद विसरावे लागतील. आम्ही कोणीतरी वेगळे ‘पाणीबंद कप्पे’ आहोत, ही जी भावना आहे किंवा एकमेकाला लिहून टाकले म्हणजे काम संपले ही जी भावना आहे, ती आपल्याला नाहीशी केली पाहिजे. सर्वांनी मन घालून, हे महत्त्वाचे काम आहे असे मानून ताबडतोब निर्णय घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पाटबंधाऱ्याचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, यामुळे कमीतकमी सहा पटीने उत्पादन वाढते. शिवाय तुम्हाला दोन पिके मिळतात. पाऊस आला, नाही आला, तरी त्यापासून फायदा मिळतो. तेव्हा या बाबतीमध्ये जास्तीत जास्त उत्साह दाखविणे आणि त्याची पद्धतशीर योजना तयार करणे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये ज्या-ज्या खात्यांचा संबंध येत असेल, मग ते महसूल असो, वन असो या सर्वांना जो काही हिस्सा उचलावयाचा तो उचलण्यासाठी त्यांनी तयार असले पाहिजे. एकमेकांना विचारायला पाहिजे, की आपण त्यामध्ये काय करू शकतो? पुनर्वसनाचा प्रश्‍न घ्या किंवा पाटबंधाऱ्यांचा प्रश्‍न घ्या. यामध्ये वेगवेगळ्या खात्यांशी संबंध येतो. कोयना प्रकल्पामध्ये आम्ही पाहिले, की कशाचा कशाला मेळ लागत नाही. कागद एवढे जमतात पण त्यांच्यातून निष्पन्न काही निघत नाही. म्हणून एक नवीन यंत्रणा तयार केली आहे. हे कशाकरिता? ज्या खात्याचा जसा दृष्टिकोन आहे, ते खाते स्वतःच फेरविचार करणार असल्यामुळे त्याच्यातून भरीव असे काम निघत नाही. त्यामुळे आपण पाहत आहोत, की या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये लोकांत एक वेगळी भावना निर्माण होते, की या कामाबद्दल या लोकांना आस्था नाही. नुसते ‘उपर लिखा है... वर गेलेले आहे!’ याचा काही शेवट लागणार आहे, की नाही अशी शंका लोकांना वाटायला लागते.

नकारात्मक दृष्टिकोन सोडा
नेहमी आपल्या व्यवहारामध्ये ही पद्धत आहे, की न करणे हे कमी धोक्‍याचे आहे. म्हणजे अजिबातच धोक्‍याचे नाही. न करणे ही गोष्ट सर्वांत सुरक्षितपणाची! काही सूचना आली, काही नियमावली असली, तर त्यांचा अभ्यास करताना असे आपण पाहतो, की त्यामध्ये कुठे तरी, काही तरी असा मजकूर सापडेल, की जेणेकरून मी नाही म्हणू शकेन. नेमकी हीच गोष्ट आपल्या देशाचे नुकसान करीत आहे. मी या मताचा आहे, की ‘न करणारा माणूस’ हा जास्त मोठा गुन्हेगार आहे. काम करीत असताना ‘अजाणता चूक’ करणारा मनुष्य बिलकुल गुन्हेगार नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्या नियमामध्ये बदल केला पाहिजे. मी आपल्याला सूचना दिल्या आहेत. काम न करणे हे वाईट. काम करीत असताना जर एखादी चूक नकळत झाली, तर तिच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सर्वसाधारणतः आपल्या एकंदर प्रशासनाचा यावर भर असतो, की प्रत्येक जण हा अप्रामाणिक आहे. असे आपण धरून चालतो; कारण ही पूर्वीची परंपरा आहे. या परंपरेमुळे आपल्यात शिस्तही आली आहे. यात साधारणतः आपले नियम प्रत्येक जण अप्रामाणिक आहे, असे समजून केलेले आहेत. तो अप्रमाणिकपणा करणार नाही याकरिता त्याला नियंत्रण, प्रतिनियंत्रण लावण्याचा आपण आपल्या प्रशासनामध्ये प्रयत्न केला आहे. यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण प्रामाणिक आहे, असे धरून चालले पाहिजे. जसा गुन्हेगार हा गुन्हा शाबीत होईपर्यंत निर्दोष आहे, असा आपला कायदा आहे; तसे प्रशासनामध्ये काम करणारा माणूस गुन्हा करीत नाही, तोपर्यंत प्रामाणिक आहे, असे मानले गेले पाहिजे. 

‘अहवाल’ ही कसोटी नव्हे
दुसरी गोष्ट, आपल्याजवळ येणारा कागद निकालात काढताना त्या निकालाचा उत्पादनावर काय परिणाम होईल, याचा विचार करा. नेहमीच्या ठराविक कामात आपला फार वेळ जातो. अहवाल देण्यातही जास्त वेळ जातो. आपल्याला फेरविचार करावा लागणार आहे. या दृष्टिकोनातून दिरंगाई टाळणे, कार्यक्षमता वाढविणे आणि प्रत्येकाने निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रामाणिकपणाने मन लावून काम करणे, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दृष्टिकोनातून आपले खाते जेव्हा काम करायला लागेल तेव्हा लोक आपणहून म्हणतील, की प्रशासन आता इतके सुधारले आहे, की त्याबाबतीत तक्रार करण्यासारखे कारण नाही. लोक इतके शहाणे आहेत. आमच्या अधिकाऱ्याचा अहवाल ही आमची कसोटी नाही. आमचे प्रशासन सुधारले आहे, याची खरी कसोटी म्हणजे लोकांनी आपल्याला तशा तऱ्हेचे प्रशस्तिपत्र दिले पाहिजे. 

एकसूत्रीपणाची जरुरी
मी आपल्याला पुन्हा सांगतो. शेतकी खाते आहे. या खात्याची दुसऱ्या पिकाची, गव्हाची योजना जुलैमध्ये तयार झाली. पण, अजूनही शेतकऱ्यांना बी पोचलेले नाही. खत भरपूर आहे, पण पेरायच्या वेळेला जाईल की नाही, याची शंका आहे. याचे काय कारण आहे? यासाठी लागणारे पावणेसात कोटी रुपये अर्थ खात्याने मंजूर करून टाकले आहेत. पाच हजार एकरांमध्ये दुसरे पीक रब्बीचे, गव्हाचे घेण्याची योजना आहे. गव्हाच्या पिकाची योजना मंजूर झाली. पावणेसहा कोटी रुपये त्याकरिता मंजूर झाले. पण, साधारणतः आपली पद्धत ही आहे, की मदत वेळेवर कधी पोचणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये एवढे नैराश्‍य येते, की लोक म्हणतात ‘ही कसली पद्धत?’ पेरण्यांनंतर जर तुम्ही खत पाठविणार असाल, कोठून तरी आम्ही आणल्यानंतर तुम्ही जर बी देणार असाल, तर तुम्हाला निकड आहे कुठे? ही गोष्ट लहान नाही; ही बाब फार मोठी आहे. त्यामुळे लोकांच्या भावना कलुषित होऊ शकतात, याची आपण कल्पना करा. बियांच्या वेळेला बी नाही, खताच्या वेळेला खत नाही, पाणी देण्याच्या वेळेला इंजिन नाही, इंजिन बिघडले तर माणूस नाही किंवा त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल नाही, तर लोक म्हणतील की हे कसले प्रशासन आहे? 
साधारणतः खात्या-खात्यामध्ये एकसूत्रीपणा नसल्यामुळे हे होते, हे आपण अनुभवले आहे. कार्यक्षमता म्हणजे केवळ अहवाल तयार करण्याची कार्यक्षमता नको. 

विजेसारखा परिणाम हवा
देश कोणत्याही कार्याकरिता उभा राहतो, याचा अर्थ प्रत्येक खात्यात शेवटच्या माणसापर्यंत सारी यंत्रणा उभी ठाकली आहे, असा होतो. खात्याचा मंत्री उभा राहिला, संचालक उभा राहिला, त्याच्या खालचा अधीक्षक उभा राहिला आणि शेवटपर्यंत सारे उभे राहिले म्हणजे म्हणता येईल, की त्या खात्यामध्ये कार्यक्षमता आहे. अशा तऱ्हेने सर्व खात्यांमध्ये कार्यक्षमता येऊन त्याची एकसूत्रता इतकी सुंदर होईल, की सरकारी यंत्रणा केवळ लिखापढी करण्याकरिता नव्हे, तर काम करण्याच्या भावनेने राबविली जाते, ही भावना त्यातून निर्माण होईल. अशी भावना निर्माण होईल, अशी कृती आपल्या हातून घडली पाहिजे. या दृष्टीनेच मी आपल्या विश्‍वासावर जनतेला कबूल केलेले आहे, की आम्ही प्रशासन सुधारणार आहोत. मी आज आहे, उद्या नसणार; प्रशासन मात्र कायम राहणार. म्हणून आपण जर आज या परीक्षेत उतरलो नाही, तर प्रशासनाला लोकांकडून एक उत्तम तऱ्हेचे प्रशस्तिपत्र मिळवून देण्याची संधी आपण गमावली, असे मी म्हणेन. आपले हुद्दे वाढोत, आपले पगार वाढोत, पण प्रतिष्ठा वाढणार नाही. ती प्रतिष्ठा वाढविण्याच्या दृष्टीने या प्रसंगी आपण परीक्षेत उतरलो पाहिजे. मी जे लोकांना वचन दिलेले आहे ते तुमच्या सर्वांच्या विश्‍वासावर दिलेले आहे आणि तो विश्‍वास खरा ठरविण्याचे निश्‍चयाने तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. आपल्या हातातील जी खाती आहेत, तेथील शेवटच्या टोकापर्यंत जे लोक आहेत तिथपर्यंत ही भावना बरोबर विजेसारखी ताबडतोब जाऊन पोचली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. 

अपेक्षा पूर्ण करा
लोक आपल्याला नावे ठेवतात, नाही असे नाही. सर्व खऱ्या प्रमाणात ठेवतात, असे मी म्हणत नाही. कार्यक्षमता अशी की जिच्यामुळे आपल्याला समाधान आहे, आपल्या अंतःकरणाला समाधान आहे, अशी कार्यक्षमता आपल्या प्रत्येक खात्यामध्ये आली पाहिजे. उधळपट्टी बंद केली पाहिजे. लोकांशी वागण्याची पद्धत मित्रत्वाची असली पाहिजे. लोकांचा उत्साह वाढविणारी असली पाहिजे. उत्पादनकार्यामध्ये त्यांना मदत करणारी असली पाहिजे. देशाची शक्ती वाढविण्याच्या बाबतीमध्ये इतर वर्गापासून आपण ज्या अपेक्षा करतो त्याच अपेक्षा आपल्यापासून लोक करतात, त्याची जाणीव असली पाहिजे आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न झाले पाहिजे. या माझ्या कार्यक्षमतेच्या कल्पना आहेत. मी आशा करतो, की त्या कल्पना आपण आत्मसात कराल. आपल्या खात्याच्या शेवटच्या माणसापर्यंत त्या नेऊन पोचवाल व वरीलप्रमाणे विद्युत परिणाम प्रशासनामध्ये झाला असल्याचे प्रत्ययास आणून द्याल.

('आवाहन' या वसंतराव नाईक यांच्या भाषणसंग्रहातून साभार.)

इतर अॅग्रो विशेष
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...