राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने नेत्यांची अस्तित्वाची लढाई

राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने नेत्यांची अस्तित्वाची लढाई
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने नेत्यांची अस्तित्वाची लढाई

मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य घटल्याने मनसेचे नेते राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी नेते लोकसभेच्या मैदानात एकाकी पडल्याचे चित्र आहे. आघाडी अथवा युतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या नेत्यांवर राजकीय अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई, ठाण्यात लाखाच्या घरात मते घेतली होती. त्यामुळे एक नवा राजकीय पर्याय म्हणून मनसे समोर आला होता. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. लोकसभेतील दारुण पराभवानंतर मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, मधल्या काळात मनसेला लागलेली गळती आणि कार्यकर्त्यांना ठोस कार्यक्रम न दिल्याने संघटनेत शिथिलता आली आहे. लोकसभेचे घोडामैदान जवळ असतानाही निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याने मनसैनिक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. काँग्रेसमध्ये कार्यरत असेपर्यंत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राज्याच्या राजकारणात दखल घेतली जात होती. परंतु, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणे यांचे राजकीय वजन झपाट्याने कमी झाले. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान नावाने स्वतंत्र पक्ष काढला असला तरी या पक्षाचे अस्तित्व केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. राणे यांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा केल्यानंतरही राजकीय वर्तुळात या घोषणेची फारशी दखल घेण्यात आली नाही. शिवसेना विरोध हेच राणेंच्या राजकारणाचे मुख्य सूत्र असल्याने या निवडणुकीत भाजपकडून त्यांना पूर्वीसारखी मदत मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात आघाडीचा पाठिंबा घेऊन राणेंना आपली राजकीय ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आठवले, शेट्टी, जानकर, मेटे यांना महायुतीत मानाचे स्थान होते. मेटे वगळता अन्य तीनही नेत्यांना लोकसभेच्या एक-दोन जागा देण्यात आल्या होत्या. शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली तरी उर्वरित नेते अद्याप भाजपसोबत आहेत. भाजपने या वेळी छोट्या घटक पक्षांना जागा न सोडण्याचे ठरवले आहे. आठवले ईशान्य मुंबईसाठी आग्रही असले तरी त्यांची आश्वासनावर बोळवण केली जाईल, अशी चिन्हे आहेत. महादेव जानकर यांना बारामतीची एकमेव जागा दिली जाण्याची शक्यता आहे. तर गेल्यावेळी माढामधून लढणारे सदाभाऊ खोत आणि आमदार मेटे यांच्यावर भाजपचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. या नेत्यांची अवस्था ''ना घर का ना घाट का'' अशी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com