जमिनीच्या अारोग्यासाठी अधिक उत्पादनाला दिली बगल

मी पारंपरिकतेला अाधुनिकतेची जोड देत शेती करीत अाहे. अाज माझी माती जिवंत अाहे. सेंद्रिय कर्ब टिकून अाहे. यामुळे प्रत्येक पीक रासायनिक खताला प्रतिसाद देते. माझी ही शेती काळसुसंगत तसेच बदलत्या वातावरणाला पोषक बनली अाहे. शेतीतील उत्पादनात सातत्य टिकून अाहे आणि हेच मला अधिक महत्त्वाचे वाटते. - गणेशराव नानोटे, निंभारा, ता. बार्शी टाकळी
जमिनीतील भुसभुशीतपणा दाखविताना गणेशराव नानोटे.
जमिनीतील भुसभुशीतपणा दाखविताना गणेशराव नानोटे.

अकोला ः शेतीत किती पिके घ्यावीत व उत्पादन किती काढावे, याबाबत प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये मतभिन्नता असू शकते. मात्र मातीची सुपीकता जपायला हवी, यावर अाता शेतकरी, शेतीत काम करणारे तज्ज्ञ अशा सर्वांमध्ये एकमत होऊ लागले अाहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता धोक्यात अालेली असून, सध्याच्या बदलत्या वातावरणात मातीचे अारोग्य हा चर्चेचा विषय झाला अाहे. काळाची ही पावले बार्शीटाकळी तालुक्यातील निंभारा येथील गणेशराव नानोटे नावाच्या शेतकऱ्याने खूप वर्षांअाधी अोळखली. अाधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारा हा शेतकरी पारंपरिक शेतीला अाधुनिकतेची जोड तर देत अाहेच; शिवाय जमिनीची सुपीकता जोपासण्यासाठी अधिक उत्पादनाची अाससुद्धा धरत नाही. अधिकाधिक उत्पादनाचा हव्यास सोडून मातीचे अारोग्य जपण्यासाठी सातत्याने धडपडत असतो. त्यामुळेच अाज या शेतकऱ्याच्या शेतात कुठेही तुम्हाला .७० ते .९० पर्यंत सेंद्रिय कर्ब मिळतो. पायांना जमीन भुसभुशीत लागत राहते.  गणेशराव नानोटे हे कुटुंबाच्या ५० एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. यातील ३० एकरांपर्यंत जमिनीत सिंचनाची सोय अाहे. दरवर्षी २० ते २५ एकरांत ते बीटी कपाशी घेतात. उर्वरित शेतात सोयाबीन, तूर, मूग, हळद, कांदा अशी पिके घेतात. शेती करताना त्यांनी पारंपरिक अाणि प्रगत याचा सुरेख संगम साधला अाहे. शेतीतून केवळ उत्पादन काढायचे नाही, तर शेतीलाही पोषक द्रवे दिली पाहिजेत, असे त्यांचे स्पष्ट मत अाहे. एक-दोन वर्षे अधिकाधिक उत्पादन काढायचे व नंतर जमिनीचा पोत बिघडला की उत्पादन कमी होत जाते, असा अनेकांचा अनुभव अाहे. नेमकेच अापल्याला होऊ द्यायचे नाही, यासाठी नानोटे यांनी अापली काही तत्त्वे ठरवून घेतली.  एका वर्षी भरमसाठ उत्पादन अाणि दुसऱ्या वर्षी काहीच नाही, असे न होऊ देता शेतीतील उत्पादनात सातत्य कसे राहील यासाठी प्रयत्न करीत असतात. अाज उपलब्ध बियाणे, रासायनिक खते, तंत्रज्ञानाचा वापर करून अापण ३५ ते ४० क्विंटल कापूस उत्पादन करू शकतो, परंतु हे एक-दोन वर्षेच शक्य होऊ शकते. नंतर ही उत्पादकता कमी होत जाते, असे ते सांगतात. त्यामुळेच बीटी कपाशीचे पीक घ्यायचे; परंतु ते ठरलेल्या काळात म्हणजे पाच ते साडेपाच महिने ठेवून नंतर उपटायचे. बीटी कपाशी अाल्यापासून हे तत्त्व त्यांनी सातत्याने पाळले. यामुळे दरवर्षी एकरी १२ ते १४ क्विंटल कापूस त्यांना होतो. शिवाय कपाशीचे पीक काढून ते कांदा, गहू अशा पिकांची लागवड करतात.  शेतीतून घ्यायचे; शेतीलाच द्यायचे गणेशराव नानोटे दरवर्षी जी पिके घेतात त्याचे संपूर्ण अवशेष जमिनीत गाडतात. कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद, गहू, हरभरा या सर्व पिकांचे अवशेष, झाडांचा पालापाचोळा सर्व काही जमिनीत गाडतात. शेतातील तणसुद्धा बाहेर नेऊन न टाकता पिकात टाकतात. शेणखत टाकणे, शेळ्या-मेंढ्या बसविण्याचे काम केले जाते. दरवर्षी अशा पद्धतीने शेतीतील पिकांचे अवशेष, पालापाचोळा जमिनीत गाडल्याने जमिनीची सुपीकता वाढत गेली. रासायनिक खतांचा वापर करूनही या शेतीचा कर्ब .७० ते .९० पर्यंत असल्याचे ते सांगतात. पिकाला गरजेपुरतेच रासायनिक खते वापरतात. अापण सेंद्रिय शेती करीत नसल्याचे ते ठामपणे सांगतात. संपूर्ण रासायनिक नाही अाणि सेंद्रियसुद्धा नाही. यातील मध्यममार्ग साधला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com