परभणीत दूध संकलनासाठी शासकीय यंत्रणा तोकडी

भाग -१
दूध शीतकरण केंद्र
दूध शीतकरण केंद्र
परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. शाश्वत शेती उत्पादन मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतीपूरक दुग्ध व्यवसायाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, दूध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परंतु दूध संकलनासाठी अस्तित्वात असलेली शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे मुबलकता हिच समस्या (प्लेन्टी इज प्राॅब्लेम) झाल्यासारखी परिस्थिती आहे.
 
जिरायती क्षेत्र बहुल असलेल्या परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अपुऱ्या, अनियमित पावसामुळे कोणत्याच शेतीमालाच्या उत्पादनाची शाश्वती राहिली नाही. बाजारभावही कमी मिळत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी विविध शेतीपूरक उद्योगव्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे पर्याय स्त्रोत निर्माण करत आहेत. पाथरी, परभणी, गंगाखेड या तालुक्यांमध्ये दुग्धव्यवसाय चांगला रुजला आहे. मात्र जिंतूर, सेलू, पूर्णा, पालम, मानवत तालुक्यांत याचा फारसा विस्तार झालेला नाही.
 
सध्या परभणी तालुक्यातील २८, पाथरी तालुक्यातील ३१, गंगाखेड तालुक्यातील ३७ सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थाकडून दूध संकलन केले जात आहे. गंगाखेड आणि पाथरी येथे दूध शीतकरण केंद्र असले तरी तेथील दूध परभणी येथील दुग्धशाळेत पाॅईश्चरायझेशन आणि होमोजिनायझेशन प्रक्रियेसाठी न्यावे लागते.
 
गतवर्षी अल्प पावसामुळे पाथरी तालुक्यातील बाभळगांव आणि हदगांव या दोन मंडळातील खरीप हंगाम वाया गेला होता. मात्र, जायकवाडी कालव्याच्या पाणी आवर्तनामुळे विहिरी, बोअरला पाणी उपलब्ध झाल्यामुळे चारा पिकांच्या लागवडीवर भर देत शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे दैनंदिन उत्पन्नाचा स्त्रोत मिळाला आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरीदेखील बटाऊ, कंत्राटी पद्धतीने शेती करण्यापेक्षा किंवा सालगडी म्हणून काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय बरा या भावनेतून दुग्ध व्यवसाय करत आहेत.
 
अवर्षणप्रवण तालुका असलेल्या गंगाखेड तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करू लागले आहेत. परभणी शहर जवळ असल्यामुळे परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली आहे. पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे खरेदीसाठी दूध उत्पादक संस्था पतपुरवठा करत आहेत. त्यामुळे तालुक्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार होत आहे. त्यामुळे दुग्धउत्पादनात मोठी वाढ झाली आहे.
 
गतवर्षी मार्चमध्ये पाथरी येथील शीतकरण केंद्रामध्ये प्रतिदिन ६१६६ लिटर याप्रमाणे एकूण १ लाख ९१ हजार १५० लिटर दूध संकलन झाले होते. यंदाच्या मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी १४,७७८ लिटर प्रमाणे एकूण ४ लाख ५८ हजार लिटर दूध संकलन झाले. परभणी तालुक्यात गतवर्षी वर्षी मार्चमध्ये प्रतिदिन ४३५० लिटर असलेले दूध संकलन यंदाच्या मार्चमध्ये प्रतिदिन १०४७४ लिटरपर्यंत पोहचले. गंगाखेड तालुक्यातील दूध संकलनात प्रतिदिन ३०३२ वरून ५८४३ लिटरपर्यंत वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com