कोल्हापूर कृषी महोत्सवास मिळाला थंड प्रतिसाद

कोल्हापूर कृषी महोत्सवास मिळाला थंड प्रतिसाद
कोल्हापूर  : शेतकऱ्यांच्या शेतीमालाची थेट विक्री व्हावी, शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे शेतकऱ्यांना माहिती व्हाव्यात, या हेतूने येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरविली. घाईगडबडीत केलेले नियोजन, कृषिव्यतिरिक्त इतर विभागांची अनास्था आणि प्रसिद्धीच्या पातळीवर तोकडे पडलेले नियोजन याचा एकत्रित परिणाम या महोत्सवावर झाला. यामुळे प्रदर्शनात सहभागी झालेले शेतकरी, शेतकरी गट कमालीचे नाराज झाल्याचे चित्र होते. 
 
अपेक्षित विक्री न झाल्याने अनेक शेतकरी गटांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. व्याख्यानांसह अन्य कार्यक्रमांनाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने या महोत्सवाने पुरता हिरमोड केल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शनिवार (ता. ३) ते बुधवार (ता. ७) दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाची थेट विक्री व्हावी, यासह शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती एकत्रितपणे मांडता यावी, यासाठी हा महोत्सव घेण्याचा निर्णय जाहीर केला. काही जिल्ह्यात महसूल, कृषीसह अन्य विभागांनी एकत्रितपणे काम करून नियोजन केल्याने महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु कोल्हापुरात मात्र हे गणित पुरते चुकल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

हा महोत्सव कृषी विभागाचा असला तरी त्याला प्रशासनाच्या इतर शासकीय विभागांनी सहकार्य अपेक्षित होते. सर्वांनी मिळूनच हा महोत्सव यशस्वी करण्याचे नियोजन करण्याचे आदेश शासनाचे होते. मात्र कोल्हापुरात या महोत्सवासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनाच मोठ्या प्रमाणात परिश्रम करावे लागले.

इतर विभागांनी केवळ ‘प्रोसिजर’ म्हणून या महोत्सवात सहभागी होण्याची उत्सुकता दाखविली. अनेक विभागांचे केवळ स्टॉल मांडून ठेवण्यात आले. त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्याची मानसिकता फारशी दिसली नाही. विशेष म्हणजे पहिले दोन ते तीन दिवस तर केवळ शुकशुकाटाचा अनुभवच महोत्सवस्थळी आला. अगदी मोजक्‍याच कर्मचाऱ्यांवर कामाचा, नियोजनाचा मोठा बोजा पडल्याने त्यांच्यावरही मर्यादा आल्या. 

हजारो रुपये खर्च करून जिल्ह्यातील दूरवरच्या भागातील शेतकरी आपले धान्य, वेगवेगळे उल्लेखनीय पदार्थ विक्रीसाठी घेऊन आले होते. महसूल, कृषी राज्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. उद्‌घाटनाचे दोन ते चार तास वगळता इतर वेळी अनेक स्टॉल रिकामे होते. शिवारात शेतीकामे सुरू असतानाही विविध पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची महोत्सवास प्रतिसाद नसल्याने मोठी कुचंबणा झाल्याचे चित्र सातत्याने दिसून आले.

यापूर्वीच्या महोत्सवात मोठी गर्दी अनुभवलेल्या कृषी विभागाला ही किमया साधता आली नाही. सर्व विभागाचे काम एकत्रित आल्याने आमच्यावर महोत्सवाच्या मांडणीचा दबाव असल्याची प्रतिक्रिया आयोजकांकडून देण्यात आली. 

पहिल्या दोन दिवसांच्या तोकड्या प्रतिसादानंतरही काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. दहावी, बारावीच्या परीक्षा, नुकतीच झालेली इतर खासगी प्रदर्शने यामुळे महोत्सवास कमी प्रतिसाद मिळाल्याचे कारण कृषी विभागातून खासगीत देण्यात येत आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच शेजारच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला होता. या ठिकाणी एकत्रित प्रयत्न झाल्याने ग्राहक, शेतकऱ्यांना आकर्षित करणे शक्‍य झाले; परंतु कोल्हापुरात मात्र नेमके उलटे चित्र पाहावयास मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com