‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित

अन्न प्रशासनाने सुचविलेल्या सूचनांनुसार आम्ही पूर्तता करत आहोत. कारखान्याने यंदा चार लाख ६० हजार मेट्रिक टनांचे गाळप करून चार लाख २१ हजार पोती साखर उत्पादित केली आहे. - विठ्ठल दगडे , प्रभारी कार्यकारी संचालक, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, पांगरी, परळी.
वैद्यनाथ कारखाना
वैद्यनाथ कारखाना
बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत आढळलेल्या त्रुटी ८८ दिवसांनंतरही पूर्ण न केल्याने पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आला. निलंबन काळात गाळपासह कारखान्याला कुठलाही खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येणार नाही. 
 
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात अाठ डिसेंबरला रसाच्या टाकीचा स्फोट होऊन उकळता रस अंगावर पडल्याने झालेल्या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. कारखान्यातर्फे या मयत कर्मचाऱ्यांना मोठी आर्थिक मदतही देण्यात आली.
 
या घटनेनंतर अन्न औषधी प्रशासनाच्या मुंबई येथील गुप्त वार्ता विभागाच्या पथकाने १६ डिसेंबरला कारखान्याला भेट दिली. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. टी. जाधवर यांच्यासह दक्षता व गुप्त वार्ता विभागाचे मि. ट. महांजद्रे, अ. व कांडेलकर, अ. द. खडके यांच्या पथकाने अानुषंगिक १५ मुद्द्यांची तपासणी केली. यामध्ये आढळलेल्या त्रुटी पूर्तता करण्याचे या पथकाने कारखाना प्रशासनाला सांगितले. त्यानंतर पुन्हा अन्न प्रशासनाच्या पथकाने त्रुटींची पूर्तता करण्याबाबत २३ जानेवारीला सुधारणा नोटीस बजावली. त्यावर १६ फेब्रुवारीला कारखान्याने ३० दिवसांचा वेळ मागितला. 
 
दरम्यान, त्यानंतर त्रुटींची पूर्तता केली की नाही याची अन्न प्रशासनाच्या पथकाने १५ मार्चला (८८ दिवसांनी) पुन्हा फेरतपासणी केली असता १५ पैकी सहा मुद्द्यांची कारखाना प्रशासनाने पूर्तता केली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कारखान्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश बीड येथील सहायक आयुक्त (अन्न) अभिमन्यू केरुरे यांनी १९ मार्चला पारित केले आहेत. ११ ते २० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीसाठी कारखान्याचा परवाना निलंबित असेल. या विरोधात कारखान्याला मुंबई येथील अन्न सुरक्षा आयुक्तांकडे दाद मागता येणार आहे.

पूर्तता न झालेल्या प्रमुख त्रुटी

  • कारखान्याच्या विविध दहा खरेदीदारांना साखर विकली जाते. त्यांचा अन्न सुरक्षा मानद परवाना आढळला नाही.  
  • एकूण ७ टँकपैकी २ टँकचे इन्शुलेशनचे काम सुरूच होते.
  • बंद असलेली यंत्रे आणि सामान तसेच अडगळीत पडलेले होते. 
  • अास्थापनेतील कामगार संरक्षक गणवेश व बूट वापरत नव्हते.
  • चांगले उत्पादन/स्वच्छता पद्धतीच्या अानुषंगाचे कागदपत्रांची पूर्तता नाही.
  • रंग देण्याचे काम अर्धवट.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com