कर्जमाफीसाठी वऱ्हाडात सव्वाचार लाखांवर अर्ज

कर्जमाफी अर्ज
कर्जमाफी अर्ज

अकोला : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी शुक्रवार (ता. १५) पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यानुसार सुरू असलेल्या प्रक्रियेअंतर्गत वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सव्वाचार लाखांवर शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले अाहेत.

सर्वाधिक ऑनलाइन अर्ज बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ३५ हजार २५० दाखल झाले अाहे. त्यानंतर वाशीममध्ये एक लाख १३ हजार १३४ तर अकोल्यात ९० हजार ७०२ दाखल झाले अाहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवळ नाव नोंदणी केली आहे, त्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज भरला गेल्याची खात्री करावी, असेही प्रशासनाने कळविले आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची नावनोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधित शेतकरी पती-पत्नी दोघेही, त्यांचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांकासह उपस्थित असणे आवश्यक आहे.

तसेच कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज खाते क्रमांक, बचत खाते क्रमांक आदी माहिती अर्जामध्ये भरणे बंधनकारक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना असंख्य अडचणी येत आहेत. कुठे वीजपुरवठा खंडित होतो, कुठे नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही, अशी स्थिती अाहे.

वाशीम जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५९ हजार १३० शेतकऱ्यांनी विविध केंद्रांवर नावनोंदणी केलेली आहे. यापैकी १ लाख १३ हजार १३४ शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नावनोंदणी झाल्यानंतरही आवश्यक कागदपत्रे नसल्याने किंवा शेतकरी पती-पत्नी हजर नसल्याने उर्वरित ४५ हजार ९९६ शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेलेले नाहीत. या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरले गेल्याशिवाय त्यांना कर्जमाफी अथवा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार नाही. अशीच परिस्थिती अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत आहे.

अकोला जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू असून, मंगळवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत जिल्ह्यात ९० हजार ७०२ थकबाकीदार शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. उर्वरित ७२ हजार २९८ शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम अद्याप बाकी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४ सप्टेंबरपर्यंत दोन लाख ९१ हजार ९०३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, त्यापैकी दोन लाख ३५ हजार २५० शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. या जिल्ह्यात ९० महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अर्ज भरण्याचे काम तातडीने पूर्ण करा कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामाचा आढावा संनियंत्रण समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता. ५) अपर जिल्हाधिकारी राजेंद्र खवले यांनी घेतला. कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी जिल्ह्यातील सेतू केंद्र संचालकांना या वेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com