कर्जमाफीचा दिवाळी मुहूर्त टळणार?

मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. या वेळी कर्जमाफीच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता असलेल्या राज्यभरातील सुमारे चार हजार गावांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जमाफीचा दिवाळी मुहूर्त टळणार?
कर्जमाफीचा दिवाळी मुहूर्त टळणार?

पुणे : दिवाळीसारख्या महत्त्वपूर्ण सणाआधी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याचे आश्‍वासन सरकारकडून वारंवार देण्यात आले. सरकारने जाहीर केल्यानुसार किमान काही जिल्ह्यांत तरी कर्जमाफीचे लाभ मिळणे अपेक्षित आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील आकडेवारी उपलब्ध न होणे, त्रुटींची पुनर्तपासणी, लेखापरीक्षण आणि अपलोडिंगला होत असलेला प्रलंब, सर्व्हर डाउन, अनेक ग्रामपंचायतींमध्ये चावडीवाचनही अपूर्ण, आचारसंहितेचा बडगा आदी कारणांमुळे दिवाळीचा मुहूर्त टळणार असल्याचे चित्र आहे. परिणामी कसेतरी रेटून बोटावर मोजता येईल एवढ्या ठिकाणी कर्जमाफी देऊन स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि शेतकऱ्यांना पुन्हा आशेला लावायचे असा प्रयत्न होणार असल्याची चिन्हे आहेत.

सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश 9 ऑक्‍टोबरअखेर विविध 33 राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बॅंकांनी सुमारे 30 लाख खातेदारांची कर्जाबाबतची माहिती, तसेच 30 जिल्हा बॅंकांकडून 36 लाख खातेदारांच्या कर्जाची माहिती विहित नमुन्यात भरण्यात आली आहे. बॅंकांकडील माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत ऑनलाइन अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या माहितीची राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणक आज्ञावलीद्वारे खातरजमा होईल. त्यानंतर कर्जमाफीच्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जे निरंक करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार दिवाळीआधी किमान काही जिल्ह्यात तरी कर्जमाफीचे लाभ देण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी या बैठकीत सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

सोलापूरमध्ये पाठपुरावा सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 93 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. जिल्हा बॅंकेशी संबंधित सर्व 1200 सोसायट्यांमधीलही शेतकरी अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील आकडेवारी अद्यापही उपलब्ध झालेली नाही.

नाशिक जिल्हा बॅंकेची आघाडी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्जमाफीची माहिती अपलोड करण्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. सरकारच्या संकेतस्थळावर आतापर्यंत 3326 विविध कार्यकारी संस्था व बॅंक शाखांची माहिती अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी नाशिक जिल्हा बॅंकेने 523 संस्थांची माहिती अपलोड केली आहे.

धुळे जिल्ह्यात अपलोडिंगची समस्या धुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसंबंधीची 91 हजार 868 प्रकरणे, तर जळगाव जिल्ह्यातील दोन लाख 27 हजार प्रकरणांचे लेखापरीक्षण अद्याप सुरूच आहे. हे लेखापरीक्षण या आठवड्यात पूर्ण होईल. यातच संबंधित पात्र कर्जदार, नियमित कर्जदारांच्या याद्या आपले सरकार या वेब पोर्टलवर अपलोड करायला सुरवात झाली आहे, परंतु सर्व्हर डाउनमुळे याद्या अपलोड होण्यास अडचण येत आहे.

जळगाव जिल्ह्यात अडचणी जळगाव जिल्ह्यात दोन लाख 27 हजार अर्जांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. जळगाव शहरातील जिल्हा देखरेख संघाच्या कार्यालयात या संबंधीची कार्यवाही सुरू आहे. तसेच पात्र अर्जांच्या याद्या अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. परंतु सर्व्हर डाउनमुळे अडचणी येत असून, अजून एक लाख अर्जांचे लेखापरीक्षण राहिले आहे.

परभणी जिल्ह्यात दिली जात आहे गती जिल्ह्यातील 703 ग्रामपंचायतीअंतर्गतच्या 774 गावांतील 3 लाख 65 हजार 327 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 63 शाखांतंर्गतच्या 445 विविध कार्यकारी सेवा संस्था स्तरावर 97,474 शेतकऱ्यांची माहिती 1 ते 66 कॉलममध्ये भरण्यात आली आहे.

विदर्भात प्रक्रिया रखडली विदर्भात बॅंक तसेच प्रशासकीय स्तरावरील कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेली नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातदेखील 771 पैकी केवळ 498 ग्रामपंचायतीत चावडीवाचन पूर्ण झाले. ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे हे काम रखडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातदेखील कर्जमाफीची प्रक्रिया रखडली आहे. वर्धा, गोंदिया, भंडारा आणि अर्थमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या चंद्रपूरमध्येदेखील ग्रामपंचायत निवडणूक आणि आक्षेपामुळे चावडीवाचन लांबणीवर पडले आहे.

अकोला, वाशीम जिल्ह्यांची आघाडी अकोला जिल्हयातील परिस्थिती पाहता या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे पात्र लाभार्थी 91 हजार 139 आहेत. 412 सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे. यापैकी 363 संस्थांच्या 84 हजार 325 शेतकऱ्यांची माहिती तपासून पूर्ण झाली आहे. तर 206 सोसायट्यांची माहिती मंगळवारी (ता. 10) सायंकाळपर्यंत अपलोड झाली होती. माहिती अपलोड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 37 हजार 530 एवढी आहे. अकोला व वाशीम जिल्ह्यांत जिल्हा बॅंकेच्या पात्र शेतकऱ्यांची माहिती सादर करण्यात आघाडी घेतली आहे. तर बुलडाणा जिल्हा बॅंकेने दोन दिवसांपूर्वीपर्यंत 509 संस्थांच्या 11 हजार 579 शेतकऱ्यांची माहिती दिली आहे.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वेग सांगली जिल्ह्यात कर्जमाफीच्या 700 फायली आहेत. त्यापैकी 400 फायली अपलोड करण्यात आलेल्या असून, शिल्लक फायली लवकरात लवकर अपलोड करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात कर्जमाफीसाठी कर्जमाफीसाठी 2 लाख 51 हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांचे लेखापरीक्षण होऊन त्यातील माहिती संगणकाद्वारे भरण्याचे काम वेगात सुरु आहे.

मराठवाड्यात 16 लाखांवर अर्ज ज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी मराठवाड्यातून ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता 16 लाख 53 हजार 397 इतकी असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 16 लाख 3 हजार 896 शेतकऱ्यांचे आधार जोडलेले असून, 49 हजार 501 कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करताना आपले आधारच जोडले नसल्याची माहिती होती. 1 ते 66 ची माहिती विकास सोसायट्या आणि बॅंकांकडून भरण्याचे काम सुरू आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत हे काम पूर्ण झाले असून, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ऑडिटरकडूनही तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com